*कोकण Express*
*मधुसूदन नानिवडेकरांच्या स्मरणार्थ गझलमंच उभारणार*
*तमाम गझलप्रेमींना सूचना पाठवण्याचे आवाहन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
ख्यातनाम मराठी गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे ११ जुलै रोजी निधन झाले. ‘निघावयास हरकत नाही’, या आपल्या गझलेप्रमाणे नानिवडेकर कोणतीही हरकत न घेता दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. तो दिवस ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ होता. त्यामुळे मराठी गझलेचा मेघदूत आपल्याला सोडून गेला, अशा भावना गझलप्रेमींनी व्यक्त केल्या. अतिशय संवेदनशील मनाच्या या प्रतिभावंत गझलकाराची स्मृती चिरंतन राहावी, असे सगळ्यांना वाटत आहे. म्हणूनच मधुसूदन नानिवडेकर गझलमंच, सिंधुदुर्गची स्थापना करून दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी त्यांचा स्मृती समारोह साजरा करण्यात येणार आहे.
मधुसूदन नानिवडेकर यांच्या गझलांनी महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या गझलेच्या चांदण्यात रसिक न्हावून निघाले. त्यामुळे त्यांचे जाणे मराठी गझल प्रेमींसाठी आणि काव्य रसिकांसाठी मोठा धक्का आहे. नानिवडेकर यांच्यावर व त्यांच्या गझलांवर नितांत प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी एकत्र येऊन त्यांच्या स्मृती जपण्याचे ठरवले आहे. गझलमंच आणि स्मृती समोराह संदर्भात सूचना मागवण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यप्रेमी तसेच महाराष्ट्रातील तमाम गझलप्रेमींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी स्मृती समारोह जिल्ह्यात साजरा करता येईल. सूचना पाठवण्यासाठी संपर्क, शशिकांत तिरोडकर ९४०५२६२८६९