*कोकण Express*
*करुळ घाट २६ जुलै पर्यंत बंद.भुईबावडा, फोंडा घाट मार्गे वाहतूक वळविली*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सलग दोन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा ढासळला आहे. या पार्श्वभूमीवर करुळ घाटमार्ग २६ जुलै पर्यंत वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली असल्याची माहिती वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
रविवारी दुपारपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा ढासळला आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी दि. २६ जुलै पर्यंत रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
यावेळी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, कार्यकारी उपअभियंता श्री. कुमावत, उपअभियंता श्रीमती नम्रता पाटील, वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.