*कोकण Express*
*आमदार नितेश राणेंनी पीएमजीएसवाय सह अन्य केंद्राच्या योजनांचा अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा*
*केंद्र सरकारच्या योजनांचा जिल्हावासियांना प्राधान्याने लाभ मिळवून देणार*
*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*
भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशाच्या एमएसएमइ खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्र शासनाच्या योजनेतील जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला. नारायण राणेना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांच्या मानत “आमचे दादा मंत्री झाले… आता आमची सगळी विकासाची कामे होणार” अशी भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा प्राधान्याने लाभ मिळावा यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील कामांचा जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडून आज ओम गणेश निवासस्थानी आढावा घेतला. केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हावासियांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी काय करता येईल, याबाबत आजच्या आढावा बैठकीत उहापोह करण्यात आला.