*कोकण Express*
*राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेला पक्षातील कार्यकर्त्यांना टिकून ठेवण्याची चिंता..*
*शिवसेना नेत्यांच्या ‘त्या’ स्टेटमेंट म्हणजे शिवसेना घाबरल्याची खळबळ*
*राजीनामे देवून निवडणूकीला सामोरे या तेव्हा समजेल जनतेचा कौल*
*राणेंमुळे कोकण पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल ; राजन तेली..*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
कोकणचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व नाम. नारायण राणे यांच्या राजकीय कार्याचा विचार करून भाजपा केंद्रीय नेतृत्त्वाने त्यांचा योग्य तो सन्मान करत त्यांच्यावर देशाच्या केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली. हा सन्मान नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचा तर आहेच, त्यासोबतच तो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणाचा सन्मान आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपाच्या वतीने केंद्रीय भाजपा नेतृत्त्वाचे आभार मानतो. परंतु नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली आणि त्यांचे आमदार, खासदार निरनिराळी स्टेटमेंट करू लागले. मात्र ही स्टेटमेंट आपल्याच कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही, हेच दाखवतात. या जिल्ह्याच्या आमदार आणि खासदारांनी भारतीय जनता पक्षावर टिका करताना थोडा विचार करून करा. कारण, भाजप तुमच्यासोबत नसता, तर तुम्ही खासदार झाला असता का? जर तुम्हाला एवढीच कुमकुमी असेल, तर तुमचे राजीनामे द्या आणि निवडणूकीला सामोरे या. मग दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल आणि कोकणातली जनता कोणाबरोबर आहे, हेही समजून जाईल, असा पलटवार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच उद्या होणाऱ्या वेंगुर्ले मच्छिमार्केटच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आॕनलाईन उपस्थिती दर्शविणार असल्याची माहितीही राजन तेली यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
नारायण राणे यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे केंद्रीय मंत्री बनले. ही बाब शिवसेनेला टोचू लागली आणि त्यांच्या गोटात खळबळ उडाली. त्यासाठी आपले कार्याकर्ते आपल्यासोबत राहतील की न राहतील, अशी भीती निर्माण झालेले हे आमदार, खासदार आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मोठमोठी स्टेटमेंट देवू लागले. भाजपा ने पाठीत खंजिर खुपसला, असे म्हणणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेनेच भाजपाला खंजिर खुपसला, हे विसरू नये. जिल्ह्यात कोरोनामुळे कित्तेक लोक गेले. आरोग्ययंत्रणेची दूर्दशा झालेली आहे. अजूनही फिजिशियन, आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. विकासात्मक कामांचा कुठेच लवलेश दिसत नाही. कोकण अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे. याला जबाबदार हे भाजपच्या जीवावर निवडून आलेले लोकप्रतिनिधीच आहेत. चिपीचं विमानतळ अजून सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. तरुणांचे रोजगारा मिळवून देवू, असे सांगून अर्ज घेतले. त्यांचीही फसवणूकच केली. MIDC, हॉस्पिटल, विमानतळ सगळी आश्वासनं पोकळ निघाल्याचं आता जनतेलाही कळून चुकलंय. त्यामुळे लोकांना भरकटवण्यासाठी भाजपावर टिकास्त्र सोडणं चालू आहे. परंतु तुम्ही टिका करत रहा. मात्र पुढची जि. प., पं. स., जिल्हा बँक या सगळ्याच ठिकाणी भाजपाचा झेंडा स्वबळाने फडकेल, हे ध्यानात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुरेश प्रभू आणि भाजपामध्ये अतिशय सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे तिथे काडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने करू नये. देशात, राज्यात तसेच कोकणात भाजपाची संघटना बांधणी अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यासोबतच जनहितासाठी भाजपा करत असलेलं कामही खुप मोठं आहे. याचा सुरुवातीपासूनच जनता विचार करत आलीय. यापुढेही भाजपाचं कार्यक्षेत्र वाढत जाईल. आता भाजपाकडे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांचे फोन वाजू लागलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या येण्याची वाट सगळेजण बघू लागलेत. त्यामुळे लवकरच भाजपाकडे इतर पक्षातून इनकमिंग व्हायला सुरुवात होणार आहे, असेही राजन तेली यांनी म्हटले आहे.
नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्याने आता रखडलेलं एअरपोर्टचं कामही लवकरच मार्गी लागेल. तसेच हायवेचा प्रश्न, सागरी महामार्ग, बीएसएनएलच्या नेटवर्कचा प्रश्न असे इतर प्रश्न, जे खासदारांना जमले नाहीत, ते लवकरात लवकर आता पूर्ण होतील. नारायण राणे यांना जे सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्र्याचं खातं मिळालेलं आहे, ते खऱ्या अर्थाने रोजगाराचा चालना देणारं खातं आहे. त्यामुळे कोकणातच नाही, तर संपूर्ण देशभर रोजगार संधी उपलब्ध होतील. कोरोनाच्या काळात डबघाईला आलेले उद्योगधंदे पुन्हा सुरळीत करण्याचं आणि त्याआधारे देशाला पुन्हा आर्थिक महासत्ता बनवण्याच्या मार्गावर नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. या कामात नारायण राणे यांचा वाटा खुप मोठा असेल. खादी बोर्ड, फळ प्रक्रीया उद्योग असे अनेक उद्योग राणेंच्या अखत्यारीत येत असल्याने कोकणालाही त्याचा फायदा होणार आहे. सावंतवाडीतील लाकडी खेळणी उद्योग, आंबा, काजू उद्योग अशा अनेक उद्योगांत यामुळे संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री रोजगार योजनेमार्फतही रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. तसेच जिल्हा भाजपामार्फत केंद्र शासनाच्या योजना कोकणात चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचं एक मुख्य केंद्र करण्यात यावं, अशी विनंती राणेंकडे करणार असल्याचे तेली म्हणाले आहेत. तसेच कोकणी जनतेच्या आणि इथल्या देवदेवतांच्या आशीर्वादामुळे नारायण राणे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे विकासाच्या वाटेवरून हल्ली बाजूला पडलेलं कोकण पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.