सिंधुदुर्गात अनेकांना गोल्ड कॉइनच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या “त्या” महिलेवर साताऱ्यात गुन्हा दाखल

सिंधुदुर्गात अनेकांना गोल्ड कॉइनच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या “त्या” महिलेवर साताऱ्यात गुन्हा दाखल

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात अनेकांना गोल्ड कॉइनच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या “त्या” महिलेवर साताऱ्यात गुन्हा दाखल…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना कोट्यावधींचा चुना लावून गोल्ड कॉइनच्या नावाखाली फसवणूक केलेल्या कणकवली तालुक्यातील जानवलीमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या महिलेवर अखेर सातारा जिल्ह्यातील भुईजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोने खरेदी करून त्याचा जादा परतावा देण्याचा बहाणा करत भुईंज येथे पाच जणांची सुमारे पाऊण कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी भुईज पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या ठिकाणाहून सदर महिलाही पसार आहे. त्या महिलेच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली असून पल्लवी आत्माराम घाडगे असे त्या महिलेचे नाव आहे. कणकवली तालुक्यातील जानवली येथील पत्ता दाखविलेल्या त्या महिलेचे कणकवली कनेक्शन​ ​समोर आल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोल्ड कॉइनच्या नावाखाली फसवणूक झालेल्या अनेक जणांना आता या प्रकरणाची उत्सुकता लागून राहिली आहे. राहुल बजरंग मोरे (भुईज) पल्लवी घाडगे (कणकवली -जानवली) यांनी संगनमताने सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे सोन्याच्या खरेदीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने काहींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत तेथे दाखल फिर्यादीनुसार राहुल मोरे याला भुईज पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही संशयित ​आरोपीं​नी गोल्ड ट्रेडिंग व्यवसायाचे आमिष दाखवा​,​ काहींना पैशांची गुंतवणूक करणे भाग पाडले. व आमिषाला बळी पडून भुईज येथील काहींनी संशयित आरोपींच्या खात्यावर ​७४ लाख ​३९ हजार ​३४ रुपये भरणा केले. सुरुवातीला दाखविलेल्या आमिषाप्रमाणे गुंतवणूक केल्यानंतरही सहा महिने अपेक्षित फायदा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी तगादा लावला. मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या पाच जणांनी भुईज येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान या पल्लवी घाडगे हिने कणकवली तालुक्यातील जानवली येथील एका कॉम्प्लेक्स मधील पत्ता दिला होता. त्यामुळे या प्रकरणात पल्लवी घाडगेचे कणकवली कनेक्शन समोर आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच पल्लवी घाडगे व तिच्यासोबत असणारा अक्षय नामक तरुण यांनी मोठ्या प्रमाणावर अशाच प्रकारे गोल्ड कॉइनचे अमिष दाखवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहींना कोट्यवधींना चुना लावल्याची बाब काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. मात्र, याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती.

जिल्ह्यातील अनेक जणांना त्या तरुणाने “गोल्डन संधी” असे भासवत त्यांची फसवणूक केली. सुरुवातीला काहींना त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेपोटी सोन्याचे कॉइन दिले गेले. मात्र, अपेक्षित रक्कम गोळा करून हे बंटी बबली पसार झाले होते. त्यामुळे फसवणूक झालेले अनेक लोक सकाळ-संध्याकाळ कणकवली तालुक्यातील जानवली नदी लगत असलेल्या राहत्या फ्लॅटच्या आसपास घिरट्या घालत होते. मात्र, बदनामीच्या भीतीने अखेरपर्यंत कुणीही पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली नव्हती. यात कणकवलीतील अनेक मोठी नावे देखील पुढे चर्चेत आली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याशी देखील फसवणूक झालेल्या काही जणांनी चर्चा केली होती. मात्र तक्रार दाखल करण्यास कोणीच पुढे येत नव्हते. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील भुईज येथे पल्लवी घाडगे हिचे नाव पोलीस रेकॉर्डला आले असले तरी या प्रकरणातील खरा सूत्रधार मात्र अद्याप मोकाटच आहे. त्यामुळे या प्रकरणातून त्याचे कनेक्शन उघड होणार का? पोलीस त्या सूत्रधाराचा शोध घेणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. आता भुईज येथे तक्रार दाखल झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोल्ड कॉइनच्या आमिषाला बळी पडलेले तक्रारीसाठी पुढे येतात का? हे​ ​देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!