*कोकण Express*
*मालवण तालुका भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध*
भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आल्याप्रकरणी आज मालवण तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला असून सरकारला जनतेशी सोयरसुतक नाही अशी टीका या निवेदनातून करण्यात आली.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, युवमोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, दत्ता वराडकर व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे. या सरकारचा निषेध आम्ही करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी भूमिका भाजप पदाधिकारी यांनी निवेदनातून मांडली.