*कोकण Express*
*जिल्हा परिषद अध्यक्षांचे जिल्ह्यातील सरपंचांकडून आभार व्यक्त!*
*सरपंचांच्या पाठीशी जिल्हा परिषद भक्कम उभी!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कोरोना कालावधीत गेल्या ३ महिन्यात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतलेल्या साहसी आणि संवेदनशील निर्णयांबद्दल जिल्हा सरपंच संघटनेच्यावतीने पत्राद्वारे त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
जिल्हा सरपंच संघटनेचे पत्र, गेल्या वर्षी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सरपंच हे कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच सरपंचांना सरकारने कोरोना कालावधीत विमा संरक्षण मिळावे अशी मागणी राज्यभरातील सर्वच सरपंच संघटना करत होत्या. आम्हाला सार्थ अभिमान आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पुढाकार घेत स्वउत्पन्नातुन जिल्ह्यातील सर्व सरपंचांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र राज्यात वेगळा आदर्श घालुन दिला आहे. त्याच बरोबरीने दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, निराश्रित आणि निराधार लोकांसाठी “व्हॅक्सीनेशन ऑन व्हील्स” मोहीम राबविण्याचा आपला निर्णय हा सामाजिक संवेदना जोपासणारा आहे. हे दोन्ही निर्णय हे ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि भविष्याचा वेध घेण्याची आपली क्षमता दर्शविणारे आहेत.
कोविड काळात ग्रामस्तरीय नियंत्रण समितीच्या माध्यमातून आपला जीव धोक्यात घालत सरपंच व त्यांचे सहकारी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवत आहेत. त्यात अनेक सरपंच कोरोनाबाधित झाले असून काही मृत्युमुखी पडले. मात्र मृत्यू झालेल्या कोणत्याही सरपंचाच्या कुटुंबीयांना विम्याचा मिळू शकला नाही. आपल्या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने आम्हा सरपंचांच्या कुटुंबाच्या पाठीशी जिल्हा परिषद भक्कमपणे उभी राहिलेली दिसून येत आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग, दुर्धर आजार ग्रस्त, निराश्रित आणि निराधार बांधवांना कोरोना लसीकरण करण्यासाठी “व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स” ही राज्यातील अनोखी लसीकरण सेवा सुविधा देण्यात आली. त्यामुळे ज्यांना लसीकरण केंद्रापर्यंत येणे अवघड होते, अशा वर्गाचाही लसीकरण मोहीमेत संवेदनशीलतापूर्वक विचार केला गेला आहे.
आपल्या या ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णयांबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा या नात्याने आपले आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करित असल्याचे म्हटले आहे.