वैभववाडीत १० जुलै रोजी होणार बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ ; अतुल रावराणे

वैभववाडीत १० जुलै रोजी होणार बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ ; अतुल रावराणे

*कोकण  Express*

*वैभववाडीत १० जुलै रोजी होणार बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ ; अतुल रावराणेे*

*खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार काजू कलमांचे वाटप*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

भैरी भवानी प्रतिष्ठान व शिवसैनिकांच्या सहकार्याने गेल्या वर्षी पासून ‘बळीराजा आत्मसन्मान’ योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वेंगुर्ला ७ व वेंगुर्ला ४ जातीच्या १० कलमांसह प्रत्येक शेतकऱ्याला ५ किलो सेंद्रिय खत दिले जाते. ५००० शेतकऱ्यांपर्यंत ५०,००० काजूची कलमे पोहोचविण्याचा ‘भैरी भवानी प्रतिष्ठान’ चा संकल्प असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी सांगितले. या योजनेचा शुभारंभ वैभववाडी तालुक्यातुन करण्यात येणार आहे दि.१० जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजता सुमित्रा मंगल कार्यालय एडगाव येथे वैभववाडी तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते काजू कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी पाहता वैभववाडी तालुका अव्वल ठरला असल्याचे दिसून येते. तालुक्यातून जवळपास ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ कणकवली, देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वसाधारणपणे संपूर्ण जिल्ह्यात २५००० शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सलग दोन वेळा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणामी शहरातील उद्योग-धंदे बंद झाल्याने तरुणांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरलेली आहे. या युवकांना त्यांच्या शेतीतून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील नोकरी करुन मिळणारे उत्पन्न आजची काजूची कलमे त्याला ४ वर्षात देणार आहेत. शिवाय त्या उत्पन्नात वाढच होत जाईल. साधारण एक एकर क्षेत्रावर लावलेली कलमे ५ ते ६ लाखांचे उत्पन्न त्याला वर्षाला मिळवून देणार आहेत. शेतीतून देखील आपण आर्थिक विकास साधू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनी निर्माण व्हावा, हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे भैरी भवानी प्रतिष्ठानचे अतुल रावराणे यांनी सांगितले.

याशिवाय जे शेतकरी बळीराजा आत्मसन्मान योजनेत सहभागी झाले, त्यांना आपल्या हक्काचा काजू कारखाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा आत्मसन्मान योजनेतील काजू कलमांसोबत अजून जास्तीत जास्त काजू कलमांची लागवड करताना दिसत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिष्ठानचा हेतू पुर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या काळात नोकरीपेक्षा शेतीकडे तरुण वर्ग आकर्षीत होत आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने शेतीच्या जोडधंद्यातून पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुणांना स्वयंपुर्ण करणे, हेच आमच्या प्रतिष्ठानचे धेय्य असल्याचेही रावराणे यांनी सांगितले.

वैभववाडी तालुक्याबरोबरच देवगड तालुक्यात आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते तर कणकवली तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून या योजनेचा विस्तार करणार असल्याचे अतुल रावराणे यांनी सांगितले. यावेळी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे,उपाध्यक्ष समीर रावराणे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, शहर प्रमुख प्रदिप रावराणे, लोरे नं १ चे माजी सरपंच राजेश रावराणे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!