*कोकण Express*
*पावसाळी अधिवेशनात गोंधळ..!*
*भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन!*
*मुंबई – ता. ५ :*
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार गरमा – गरमी पाहायला मिळाली. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपने केला आहे. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.