*कोकण Express”
*कृषी संजीवनी सप्ताह’ निमित्त तेंडोली येथे विविध कृषी उपक्रमांचे मार्गदर्शन..*
*सिंधुदुर्ग,दि.२४:*
जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत दिनांक २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने कुडाळ तालुका कृषी अधिकारी, श्री. रमाकांत कांबळे यांनी तालुक्यातील मौजे तेंडोली येथे विविध कृषी कामांची पाहणी केली व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
यामध्ये सन २०२१-२२ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून श्री. श्याम लक्ष्मण प्रभू यांचे १.५० हेक्टर काजू कलम लागवड, श्री. संदीप प्रभाकर प्रभू ०.७५ हेक्टर काजू कलम लागवड. श्री. निलेश सदानंद तेंडोलकर ०.२० हेक्टर नारळ लागवडीची पाहणी करून काजू व नारळ व्यवस्थापन, जमीन आरोग्य पत्रिकानुसार खतांचा संतुलित वापर, कीड व रोगाचे व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्री. भिकाजी शंकर परब यांनी केलेल्या सेलम जातीच्या हळद लागवडीची पाहणी करून खत व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. संतोष तेंडोलकर यांच्या प्रक्षेत्रावरील गादीवाफ्यावरील सोनम वाणाच्या भात रोपवाटिकेची पाहणी करून ‘श्री’पद्धतीने भात लागवडीची माहिती कृषी अधिकारी, श्री. कांबळे यांनी दिली.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. संदीप दोलताडे, कृषी पर्यवेक्षक श्री. सुधाकर खरवडे तसेच तेंडोली कृषी सहाय्यक श्रीम. रश्मी कुडाळकर व शेतकरी उपस्थित होते.