*कोकण Express*
*शिवसेना ही चळवळीतून काम करणारी संघटना*
*वाढलेल्या पेट्रोलदराविरोधात आम्ही केलं प्रातिनिधीक आंदोलन*
*कुडाळमधील राड्यावर आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेना ही चळवळीतून काम करणारी संघटना आहे. महागाईविरोधात प्रत्येक वेळी शिवसेनेने आंदोलन केले आहे. महाग झालेली प्रत्येक गोष्ट लोकांना मोफत देत असे आंदोलन शिवसेना करत आहे. आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात जनतेला स्वस्त दरात आणि भाजपा कार्यकर्त्यांना एक लीटर पेट्रोल मोफत देत होतो, अशी प्रतिक्रीया कुडाळमध्ये झालेल्या राड्यानंतर आम. वैभव नाईक यांनी बोलाताना दिली.
कुडाळमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आम. वैभव नाईक यांनी स्वस्त पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र तो पेट्रोलपंप नेमका नारायण राणेंचा निघाला आणि त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात राडा झाला होता. याविषयी बोलताना आम. वैभव नाईक म्हणाले, पेट्रोलचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. शेतीची कामे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलरमध्ये पेट्रोल, डिजेलची आवश्यकता आहे. रिक्षावालेही मेटाकुटीला आले आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांनाही पेट्रोलची गरज आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हे स्वस्त पेट्रोल दिलं. यावेळी हा पेट्रोलपंप कोणाचा होता याविषयी दुमत नव्हतं. कारण हा सरकारचा पेट्रोल पंप आहे आणि शहरामध्ये मध्यवर्ती असल्याने हा पेट्रोलपंप आम्ही निवडला. आम्ही शासनाचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून काम करतोय. या कोविडच्या स्थितीत आम्हाला कोणताही वाद करायचा नाही. हे आंदोलन ११ ते १ या कालावधीत संपवण्याचं शिवसेनेनं ठरवलं होतं. या आंदोलनाला उत्स्फुर्द प्रतिसाद मिळून शिवसेनेची २०० पाकीट वाटली गेलीत. या एक लीटरने लोकांचं एक लीटर पेट्रोलमध्ये काही होणार नाही. परंतु मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांना आणि वाढलेल्या महागाईला दाखवायचं होतं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.