*कोकण Express*
*अब्जावधी रक्कमेचे हायवे टेंडर घेणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कडे 22 हजार नाहीत ?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोट्यवधी रुपयांचे महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनकडे कणकवली शहरातीत महामार्गाच्या स्ट्रीट लाइट करिता विद्युत कनेक्शनचे चार्जेस भरण्यासाठी अवघे 22 हजार रुपये नसल्याची धक्कादायक बाब आज कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उघडकीस आली.
शहरातील हायवेच्या ज्या समस्या आहेत, त्या तातडीने मार्गी लावा अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. कणकवती शहरातील चौपदरीकरण अंतर्गत स्ट्रीट लाईट व शहरात हायवे ठेकेदार कंपनीच्या चुकांमुळे पाणी साचण्याच्या घटनेबाबत नगराध्यक्ष समीर नतावडे यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. कणकवली शहरातील सर्विस रोड व फ्लाय ओव्हर ब्रिज वरील लाईट सुरू करण्याबाबत सूचना देऊनही अर्धवट कामे ठेवल्याबद्दल नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता मण्यार व शाखा अभियंता गणेश महाजन यांनी वीज वितरणकडून याकरिता कनेक्शन मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष नलावडे यांनी महावितरणच्या अभियंत्याशी संपर्क साधत माहिती घेतली. त्यावर कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी ठेकेदार कंपनीला कोटेशन देण्यात आले असून, विद्युत कनेक्शन देण्याकरिता 22 हजार रुपये भरणा करा, अशा सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. हे 22 हजार रुपये न भरल्यामुळे शहरातीत हायवेची स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब समोर आली. तातडीने ही रक्कम भरणा करा, अशा सूचना नगराध्यक्ष नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिल्या. तसेच कणकवली शहरात गोकुळधाम हॉटेल कडील नाल्यात गेली तीन वर्षे पाणी साचण्याचा प्रकार घडत आहे. वारंवार सूचना देऊनही हे काम मार्गी लागले नाही. याबाबत ठोस उपाययोजना करा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यावर या नाल्याच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह उपअभियंता मण्यार, शाखा अभियंता महाजन यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पाहणी करत वस्तुस्थिती निदर्शनास आणली.