*कोकण Express*
*जिल्ह्यात कोवीड नियंत्रणासाठी रुग्ण कल्याण समितीचा सहभाग अपेक्षित..*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक कामकाजामध्ये सर्व पदाधिकारी, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आवाहन जि. प. अध्यक्षा संजना सावंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविडचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामस्तरावरती सर्वेक्षण करून जास्तीत जास्त प्रमाणात कोविड रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना उपचाराखाली आणले जात आहे. कोवीड रुग्णांचे निदान हे लवकर झाल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.
गृहविलगीकरनामध्ये असलेले कोवीड दूषित रुग्ण हे विलगीकरनात राहिले नाही, तर कोवीड विषाणू समाजात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हास्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीला विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत सुचित केले होते. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतींनी ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. ग्रामस्तरावर कोवीड दूषित आढळलेल्या रुग्णांना ग्राम विलगीकरण कक्षामध्ये ठेवल्यास त्यांना योग्य चिकित्सा योग्य वेळेत मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
कोविड रुग्णांच्या संपर्कात इतर सामान्य व्यक्ती, दुर्धर, असंसर्गजन्य आजार असलेले व्यक्ती यांच्यामध्ये कोवीडचा प्रसार वाढत चाललेला आहे. ग्राम स्तरावरील सर्व ग्रामस्थांची कोवीड चाचणी करणे आवश्यक आहे. याकरिता ग्राम स्तरावरील अधिकाधिक ग्रामस्थांना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन व मार्गदर्शन करून कोवीड चाचणी करून घेण्याकरिता प्रवृत्त करावे व आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अशी विनंती जि. प. अध्यक्षा संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.