*कोकण Express*
*वाघेरी गावातील कोरोनाग्रस्तांसाठी मुंबई मंडळाची साद*
*▪️वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबई चा स्तुत्य उपक्रम, सिद्धेश राणे यांनी मानले ग्रामवासियांच्या वतीने मुंबई मंडळाचे आभार*
*▪️पीपीई किट्स, ऑक्सीमीटर, थर्मामीटर, ऑक्सिजन सिलिंडर, कोरोना प्रतिबंधात्मक गोळ्या इ. साहित्य आरोग्य उपकेंद्र, वाघेरी यांच्याकडे सुपूर्द*
*▪️सॅनिटायझर व मास्क चे शिवप्रसाद राणे, प्रकाश वाघेरकर, संदेश ठुकरुल, दत्तात्रय राणे यांनी घरोघरी जात केले वाटप*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता हाहाकार… त्यात गावही हॉटस्पॉटवर…गावावर भीतीचे सावट… गावातील विकासात्मक, सामाजिक कार्यासाठी धडपडणारे युवा नेतृत्व सिद्धेश राणे यांनी व्हाट्सअप्प च्या माध्यमातून मुंबई मंडळाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली. तशी दररोज गावची खालीखुशाली घेणाऱ्या चाकरमानी वर्गाने तात्काळ दखल घेऊन आपल्या गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी दुसऱ्याच दिवशी मदत पोहोच केली.
कणकवली तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबई ने कोरोना बाधितांसह आरोग्य उपकेंद्र, वाघेरी साठी 6 पीपीई किट्स, 6 ऑक्सिमीटर, 4 थर्मामीटर, 1 ईमर्जन्सी ऑक्सिजन सिलिंडर, कोरोनावर प्रतिबंधात्मक गोळ्या, 1700 मास्क, 350 सॅनिटायझर बॉटल, इत्यादी साहित्य गावात दोन टप्प्यात पोहोच केले. यामध्ये पीपीई किट्स, ऑक्सीमीटर, थर्मामीटर, ऑक्सिजन सिलिंडर इ. साहित्य आरोग्य उपकेंद्राकडे सुपूर्द करण्यात आले तर सॅनिटायझर व मास्क इ. साहित्य गावातील तरुणांनी घरोघरी वाटप केले. यावेळी ग्रामकृतीदल समिती सह अध्यक्षा श्रीमती टुकरुल, पोलीस पाटील अनंत राणे, दत्तात्रय राणे, शिवप्रसाद राणे, प्रकाश वाघेरकर, संदेश ठुकरूल, आरोग्यसेवक श्री. सामंत, आरोग्यसेविका श्रीमती मस्के आदीजन उपस्थित होते.
गावातील प्रत्येक उपक्रमात मग ती शैक्षणिक, सामाजिक मदत असो वा दुर्धर आजारग्रस्त रुग्णास आर्थिक मदत असो की मोन्या ओहोळातील गाळ उपसा असो ग्रामविकास मंडळाने सतत पुढाकार घेतला आणि आपल्या मातूभूमीशी असलेलं नातं अधिक घट्ट केलं. आजच्या या कोरोनाच्या संकटातही त्यांनी प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करून साद घातली आहे.
मुंबई मंडळाच्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांकडून आभार तर परिसरातून कौतुक होत आहे.