*कोकण Express*
*सरकारी काम सहा महिने नव्हे तर चक्क तीन वर्षे थांब ; पुळास येथील संतापजनक घटना*
*सिंधुदुर्ग,दि.15:*
जिल्हा वार्षिक योजना सन 2019 मधील महादेवाचे केरवडे जोडणाऱ्या तरपाळी (कर्ली नदी) पुळास येथील मंजूर साकवाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता व वाडोस येथील ठेकेदार विकास प्रभाकर परब यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या तीन वर्षापासून अर्धवट व निकृष्ट ते देखील आज रोजी अपूर्ण अवस्थेत आहे. यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निराशा पदरी पडल्याची संतापजनक माहिती ग्रामस्थांच्यावतीने अनिल राऊळ यांनी दिली.
श्री. राऊळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील तसेच माणगाव पंचक्रोशीतील पुळास येथील सन 2019 मधील मंजूर साकवाच्या कामाचा कालावधी 8/3/2019 ते 7/9/2019, कामाचे अंदाजपत्रक रक्कम 22,71,833/- स्विकृत रक्कम 20,44,423/- निविदा क्रमांक 227/2018-19, निविदा खंड 20 प्रमाणे काम सुरक्षित राखण्याचा कालावधी, काम पूर्ण झालेल्या दिनांकापासून 12 महिने एवढा असताना साकवाच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाची किंमत 10,05,149/- आणि शिल्लक कामाची किंमत 12,66,684/- अशी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी (प्रत्यक्ष जागेवर) कामाची माहिती दर्शविणारा फलक (कामाचे नाव, किंमत, ठेकेदाराचे नाव, कामाचे विवरण, कार्यारंभ आदेश दिनांक, कामाची मुदत) अटीनुसार लावणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने तो अद्याप लावलेला नाही. ठेकेदाराने मार्च, एप्रिल, मे 2019 कामाला सुरुवात केली नाही. 15 जून 2019 नंतर काम सुरू केले व दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरु झाला त्यामुळे काम बंद करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी काम 3 महिने का सुरू केले नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असता 9/8/2019 पत्राने उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी. 1, सा.बां.वि. कुडाळ यांना ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र ते कागदावरच राहिले. कार्यवाही झालीच नाही. दुसऱ्या वर्षी मार्च 2020 मध्ये खांब (पिलर) व रॅम्पवर निकृष्ट काम करण्यात आले. अर्धे रॅम्प पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेले. सोबतच मातीचा भराव वाहून गेला व नदिपात्र मात्र रुंदावले गेले.
त्यानंतर 4/12/2020 रोजी ग्रामपंचायत पुळास यांचे मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना साकव अपूर्ण असल्याचे पत्र दिले गेले. तसेच 4/12/2020 कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले. त्यावेळी त्यांनी 7/12/2020 रोजी फक्त तोंडी फोनद्वारे चौकशी केली. जानेवारी 2021 मध्ये श्री. बाळा पावसकर यांच्याशी फोनवरून साकवाबद्दल विचारणा व चौकशी केली. शिवसेना विभागप्रमुख हंसराज सावंत यांनी 1/2/2021 रोजी पालकमंत्री श्री. सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 15 दिवसांचे फक्त आश्वासन मिळाले.
26/2/2021 रोजी श्री. संजय गाड व पुळास ग्रामस्थ यांनी मा. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ, मा. पोलिस निरीक्षक कुडाळ, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गनगरी ओरोस यांना साकव पूर्ण न झाल्यास 1 मे 2021 रोजी आमरण उपोषण करू असे निवेदन दिले. मात्र महाराष्ट्र दिन झेंडावंदन व जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच 16/5/2021 ला लाॅकडाऊन कालावधी वाढल्याने उपोषण करता आले नाही.
5/3/2021 रोजी पुळास गावचे रहिवासी श्री. अनिल राऊळ यांनी साकवाविषयी माहिती अधिकार अर्जाद्वारे जनमाहिती अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे माहिती मागितली. त्यानुसार 9/3/2021च्या जावक क्रमांक 938 च्या पत्राद्वारे सावंतवाडी जन माहिती अधिकारी यांनी माहिती न देता शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 कुडाळ यांना माहिती देण्यासाठी आदेश दिला. मात्र अजून पर्यंत योग्य माहिती मिळाली नाही.
16/3/2021 रोजी शिवसेना भवन (मुंबई) येथेही आमदार श्री. वैभव नाईक यांना साकवाच्या अपूर्ण कामाची व दिरंगाई बद्दल लेखी निवेदन दिले.
दरम्यानच्या काळात श्री. अनिल राऊळ यांनी दि. 24/5/2021 रोजी कोरोना महामारी व लॉकडाऊन असूनही पुळास ग्रामस्थांसोबत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1. कुडाळ, यांची प्रत्यक्ष कार्यालयात भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी मा. सौ. अनामिका जाधव यांनी तालुका व जिल्हा भार असल्याने कामात जास्त वेळ जातो, असे सांगून 2 दिवसांत काम करू असे आश्वासन दिले. परत एकदा भ्रमनिरास झाला. म्हणून 27/5/2021 रोजी पुळास ग्रामस्थांनी सरपंचासहित ठेकेदार बदली करा, असे लेखी निवेदन शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1.(मा.सौ.अनामिका जाधव व श्री. बिर्हाडे सर) यांना सादर केले. त्यानंतर शासकीय प्रक्रिया म्हणून ठेकेदार विकास परब यांना 1/6/2021 च्या पत्राने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी निविदा कलम 3 (अ) अंतर्गत काम काढून घेण्याबाबत नोटिस बजावली. मात्र विकास परब 3/6/2021 रोजी कामाच्या ठिकाणी हजर राहिले नाहीत. परिणामी श्री. बिराडे यांनी अभियंत्यांचा आदेशानुसार कामाची पाहणी व मोजदाद केली. त्यावेळी तोंडी आदेश मिळालेले दुसरे ठेकेदार श्री. शेखर पडते हजर होते. त्यांनी 4 दिवसांत काम सुरू करतो असे सांगितले. मात्र टेंडर त्यांच्या नावाने नसल्याने त्यांनी नकार दर्शविला. यामुळे परत ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला.
10/6/2021 रोजी पुन्हा पुळास ग्रामस्थ व शिवसेना तालुकाप्रमुख बाळा पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी व श्री. हंसराज सावंत विभागप्रमुख यांच्या शिष्टमंडळाने आ. वैभव नाईक यांची भेट घेऊन कामाची गरज व महत्व पटवून दिले व कार्यवाहीची अपेक्षा केली. आमदार श्री. नाईक यांच्या आदेशानुसार शिष्टमंडळाने मा. सौ. अनामिका जाधव यांची भेट घेतली. परत 4 दिवसांचे आश्वासन मिळाले. पण पाऊस व पुढील वर्ष त्यामुळे “ये रे माझ्या मागल्या” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बदली ठेकेदाराच्या नावाने 3/6/2021 रोजी टेंडर लेखी आदेश का काढला नाही, अधिकारी वेळकाढूपणा का करतात, ठेकेदारावर कारवाई करण्यात कसूर का, सरकारी पैशाचा (जनता कर) गैरवापर कसा केला गेला, या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण, मा.तहसिलदार, जिल्हाधिकारी संवेदनशील आहेत की, नाहीत, ऑडिट होते की, नाही, सरकारी यंत्रणा एवढी ढिम्म का, साकवाच्या कामाला राजकारण तर आड येत नाही ना, आतापर्यंत तीन पावसाळे मागे पडले, असे अजून किती पावसाळे जाणार आहेत, गेल्या 3 वर्षात पाठपुरावा करण्यासाठी येथील ग्रामस्थांचा वेळ व पैसाही किती वाया गेला असेल, असे काही अनुषंगिक प्रश्न ग्रामस्थांच्यावतीने श्री. अनिल राऊळ यांनी उपस्थित केले आहेत.