*कोकण Express*
*राज्यातील शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू असल्याने विलगीकरण कक्षातील शिक्षकांची नेमणूक रद्द करा…*
*परशुराम उपरकर यांची मागणी ; विलगीकरण कक्षात सुविधा वाढवा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यातील शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू झालेय. तर लवकरच ऑनलाइन शिक्षणाबाबतचे धोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांतील विलगीकरण कक्षासाठी शिक्षकांच्या झालेल्या नेमणूका रद्द करा. तसेच विलिगीकरण कक्षातील कोरोना रूग्ण सुविधा नसल्याने रात्रीचे घरी जातात. त्यामुळे विलगीकरण कक्षात चांगल्या सुविधा निर्माण करा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
श्री.उपरकर यांनी म्हटले की, गावोगावी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या १०० मिटर बाहेर देखरेख करण्यासाठी, दुपारी २ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते दुपारी दोन या वेळेत शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. मात्र विलगीकरण कक्षाबाहेर स्वच्छतागृहांची सुविधा नाही. तर कोरोना प्रादुर्भावामुळे स्थानिक नागरिकही शिक्षकांना घरात घेत नसल्याने महिला शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विलगीकरण कक्षाबाहेर १०० मिटर परिसरात पावसापासून संरक्षणाचीही व्यवस्था नाही. याखेरीज ऑनलाइन शिक्षण धोरण लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षाबाहेर शिक्षकांच्या नियुक्त तातडीने रद्द करण्यात याव्यात.
विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांसाठी गरम पाणी, शौचालय आदींची सुविधा असायला हवी. मात्र तशा सुविधा नसल्याने विलगीकरण कक्षातील रूग्ण रात्री घरी जातात आणि पहाटे पुन्हा विलगीकरण कक्षात येतात. यात कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे सर्वच विलगीकरण कक्षामध्ये सर्व सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे. त्याबाबतचे आदेशही ग्रामपंचायतींना द्यावेत अशी मागणी श्री.उपरकर यांनी केली आहे.