*कोकण Express*
*जागेच्या अतिक्रमणप्रश्नी ८५ वर्षांचे गृहस्थ बसले बेमुदत उपोषणाला*
*डॉ. अनिशा दळवी यांची यशस्वी शिष्टाई*
*दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा ग्रामस्थांचा गटविकास अधिकाऱ्यांना इशारा*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुका पं. स. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज ८५ वर्षांपेक्षाही जास्त वयाच्या वृद्ध माणसाला न्यायासाठी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उपोषणास बसावे लागले. ही शासनासाठी मोठ्या शरमेची गोष्ट असून अशा वृद्धांना हे शासन न्याय देऊ शकत नसेल, तर त्यांची वेळीच कानउघडणी करून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी दिला आहे. त्यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या घोटगे येथील सदाशिव दळवी व कुटुंबीयांच्या उपोषणाला भेट दिली व त्या ठिकाणी यशस्वी शिष्टाई करत त्यांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढला. सदाशिव दळवी यांच्या घराला त्याचाच शेजारी दांडगाई करून घर बांधतो व त्याच्या जागेवर अतिक्रमण करतो असा आरोप करत सदाशिव दळवी या वृद्ध गृहस्थाने हे उपोषण आजपासून सुरू केले होते, यावेळी या उपोषणास गटविकास अधिकारी मिलिंद जाधव व संबंधित ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक यांनी भेट दिली. यावेळी ग्रामसेवकावर ग्रामस्थांनी विविध आरोप करत त्यांना कोंडीत पकडले. आपण काय कारवाई केलात? हे दाखवा व त्यानंतर आम्हाला कारणे द्या, असे विचारताच ग्रामासेवकाला घाम फुटला. अखेर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी व आंदोलनकर्ते यात यशस्वी चर्चा करून शिष्टाई घडवून आणत दळवी व कुटुंबियांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. दहा दिवसात सदर व्यक्तीवर कारवाई केली जाईल. तसेच नियमानुसार अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, असे पत्रात म्हटले असून असे न झाल्यास आम्ही या ठिकाणी पुन्हा उपोषणास बसू असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना दिला.

