कणकवली पत्रकार समितीचा उपक्रम आदर्शवत!

कणकवली पत्रकार समितीचा उपक्रम आदर्शवत!

*कोकण  Express*

*कणकवली पत्रकार समितीचा उपक्रम आदर्शवत!*

*प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे कौतुकोद्गार!*

दशावतार कलावंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप!

कणकवली पत्रकार समिती आयोजित, ‘पत्रकार आणि मित्र’च्या वतीने, पल्लवी फाऊंडेशनच्या विद्यमाने उपक्रम!

*कणकवली ः प्रतिनिधी* 

दशावतार ही कोकणासाठी अतिजिव्हाळ्याची लोककला आहे. मात्र, मागील दिड वर्षापासून बसलेल्या कोरोना महामारीचा दशावतार कलावंतांना प्रचंड मोठा फटका सहन करावा लागला. अशावेळी पत्रकारांमधील माणुसकीने त्यांच्याफर्यंत धाव घेऊन केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद, दखलपात्र आहे. याच कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळेल आणि ‘देणाऱ्याने देत जावे’ ही वृत्ती वाढत जाईल, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांनी केले.

कणकवली पत्रकार समिती आयोजित ‘पत्रकार आणि मित्र’च्यावतीने व पल्लवी फाऊंडेशनच्या विद्यमाने येथील चौंडेश्वरी हॉल येथे सिंधुदुर्गातील दशावतारी कलावंतांना जिवनावश्यक वस्तुंची मदत देण्याचा उपक्रम सोमवारी पार पडला, त्याप्रसंगी सौ . राजमाने बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर आयएएस अधिकारी संचिता महापात्रा, तहसीलदार रमेश पवार, गुरुकृपा दशावतार मंडळाचे मारूती सावंत, चौंडेश्वरी मंगल कार्यालयाचे नाना कांबळी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी सुधीर राणे, कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या कारणास्तव दशावतार नाट्यमंडळांच्या मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

प्रेरणादायी उपक्रम

राजमाने म्हणाल्या, दशावतारी लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. या उपक्रमाचे प्रशासनाच्यावतीनेही मी कौतुक करते . दशावतारी कलावंतांनी उत्पन्नाचा कोणताही विचार न करताना ही लोककला कशी जिवंत राहील, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, आज कोरोनासारख्या महामारीच्या काळात त्यांचे कलात्मक हातही जागीच स्थिरावले. अशावेळी कणकवली तालुका पत्रकार समिती व त्यांना सहकार्य करणाऱ्या संस्थांनी दशावतार कलावंतांसाठी घेतलेली धाव नक्कीच उल्लेखनिय आहे. ही मदत म्हणजे पणतीच असून त्यामुळे आशेचा किरण सदैव तेवत राहील. ‘एकमेकांस सहाय्य करू ‘ या वृत्ती वाढत जातील. यापुढेही जग पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत एकमेकांना मदत करतच राहू. नव्याने उष:काल होणारच आहे, त्याची सर्वांनीच वाट बघूया.

आदर्शवत उपक्रम

रमेश पवार म्हणाले, लोककला जिवंत ठेवणासाठी कार्यरत असणाऱ्या या दशावतारी कलावंतांना कोरोनाने जागीच थांबविले. अशावेळी लेखणीद्वारे सामाजिकतेवर नेहमीच भाष्य करणाऱ्या पत्रकारांनी दशावतार कलावंतांसाठी एक पाऊल पुढे टाकले, हे आदर्शवत आहे. जीवनावश्यक वस्तूंची मदत करून कणकवली पत्रकार समितीने दशावतार कलावंतांना दिलेली ही मानवंदनाच आहे.

लेखणीच्या पलिकडील माणुसकी!

गणेश जेठे म्हणाले, पत्रकार हा सदैव फिल्डवर राहून काम करत असतो. एकीकडे कोरोना काळात शासनाने पत्रकारीतेला अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केले . पण, दुसरीकडे त्याच पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून मान्यता देण्यास अद्याप टाळाटाळ सुरु आहे. पण, या संकट काळातही पत्रकारांनी आपली सामाजिक बांधिलकी अगदी लेखणीच्या बाहेर जाऊनही जपली आहे.

सामाजिक बांधिलकी सदैव जपू

चंद्रशेखर देसाई म्हणाले, दशावतार कलाकार हे आमच्या कोकणचा मान अन् शान आहेत. कोरोनाच्या विळख्यामुळे त्यांना जागीच थांबावे लागले असले तरी ते कधीही डगमगले नाहीत. म्हणूनच या कलावंतांना आज मदतीचा हात देताना विलक्षण समाधान लाभत आहे. पत्रकार समितीतर्फे यापुढेही सामाजिक बांधिलकी सदैव जपली जाईल.

याप्रसंगी कणकवली पत्रकार समितीचे खजिनदार नितीन कदम, माजी अध्यक्ष भगवान लोके, ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण, सदस्य तुषार सावंत, विरेंद्र चिंदरकर, स्वप्नील वरवडेकर, पप्पू निमणकर, अनिकेत उचले, संजय पेटकर, राजन चव्हाण, उमेश बुचडे, अमित मांडवकर, गुरुप्रसाद सावंत, आनंद तांबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांनी केले. आभार पत्रकार समितीचे उपाध्यक्ष उत्तम सावंत यांनी मानले.

दशावतार कलावंतांकडूनही समाधान

यावेळी गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ हळवल, श्रीगणेश भवानी दशावतार नाट्यमंडळ हुंबरट, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ शिरवल, ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ बिडवाडी, श्री. दत्तप्रसाद दशावतार नाट्यमंडळ तिवरे, गणेश दशावतार नाट्यमंडळ कलमठ, गांगोरामेश्वर दशावतार नाट्यमंडळ बिडवाडी, नवतरूण दशावतार नाट्यमंडळ लोरे नं. २, बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कवठी, वालावलकर दशावतार नाट्यमंडळ वालावल, चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी, खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली, नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड, मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड या दशावतार नाट्यमंडळांच्या प्रत्येकी १५ कलावंतांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदरची किट्स मंडळांच्या प्रतिनिधींकडे सुफूर्द करण्यात आली असून त्यांच्यामार्फत कलावंतांपर्यंत पोहोचविली जातील. कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सर्व दशावतार मंडळे तर उर्वरित जिल्हयातील पारंपारीक दशावतार मंडळांच्या कलावंतांना प्राधान्याने वाटप करण्यात आले. याबाबत दशावतार कलावंतांनीही समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!