माडबागायतीचे आठ-दहा वर्षाचे उत्पन्न धरून भरपाई द्या

माडबागायतीचे आठ-दहा वर्षाचे उत्पन्न धरून भरपाई द्या

*कोकण  Express*

*माडबागायतीचे आठ-दहा वर्षाचे उत्पन्न धरून भरपाई द्या*

*राजन तेली यांची केंद्रीय समितीकडे मागणी*

*कणकवली:- संजना हळदिवे*

सिंधुदुर्गात १६ मे रोजी तौक्ती चक्रीवादळ झाले. त्या वादळामुळे माडबागायती, हापुस आंबा कलमे, सुपारी, कोकम, फणस व इतर झाडे यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांची भरपाई देताना माडबागायतीचे आठ-दहा वर्षाचे उत्पन्न गृहीत धरले जावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.

तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर आले आहे. या पथकाला राजन तेली यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले की, झाडे पडल्याने घरे, गोठे, दुकाने, शासकीय इमारतीचेंही मोठे नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करताना व त्याचे मुल्यमापन करताना पुढील गोष्टींचा तपशिलवार विचार व्हावा आणि त्याआधारे नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा.

पडलेल्या माडाच्या झाडाचे मुल्यांकन करताना वर्षाला किमान २०० नारळ × दर रु.२० = ४०००/- असे पुढील ८ ते १० वर्षाचे उत्पन्न किमान रु.३२,०००/- नुकसान झालेले आहे. आज उभ्या असलेल्या माडाच्या झाडाचा विचार करताना त्या झाडावरील नारळ वाऱ्याने पडलेले व जिवंत उभा दिसणाऱ्या माडाची सर्व झावळे व त्यावर दिसनारे सर्व नारळ फळे पुढील दोन महीन्यात पडून जाणार आहेत. सदर माडास पुन्हा नारळाची फलधारना होण्यास किमान ७ ते ८ महीने जातील. याचा अर्थ यावर्षी मिळणारे उत्पन्न व पुढील वर्षाचे उत्पन्न यावर परीणाम झाल्याने वार्षिक रु. ४०००/- प्रमाणे रु. ८०००/- नुकसान होणार आहे. तसेच हापुस आंबा कलम बागायतीचा विचार करता मे महीना अखेर २५ टक्के आंबा झाडावर असतो. या फळांचे वाऱ्यामुळे नुकसान झालेले आहे.

काही झाडे वाऱ्याने मोडून, उन्मळून पडलेली आहेत. अशी झाडे पुढील उत्पन्न देणार होती, याचा विचार व्हावा. याच जागेवर नवीन कलम झाड लावणेसाठी व त्याचे उत्पन्न मिळेपर्यत संगोपन करणेसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे किमान ५ ते६ हजार रुपये खर्च होतो. किमान तेवढी तरी रक्कम प्रती झाड नुकसान भरपाई मिळावी व पडून गेलेल्या फळांची पंच यादीप्रमाने नुकसान भरपाई मिळावी. त्यासोबतच सुपारी, कोकम, काजू, फणस अशा आज उभ्या असलेल्या प्रती झाडामागे रु. १०००/- नुकसान भरपाई मिळावी. तसेच ज्या घरांवर/गोठ्यांवर वादळी वाऱ्याने झाडे पडून नुकसान झाले आहे, त्यांची पंचयादी करताना शासकीय यंत्रणा वास्तवातील व्यावहारीक मुल्यांपेक्षा फारच कमी रक्कमेचे पंचनामे करीत आहेत. आता पावसाळा आला असल्याने कदाचित तात्पुरते निवारे किंवा दुरुस्ती करून वापर सुरु करावा लागणार आहे व त्यानंतर कायमस्वरुपी दुरूस्ती करावी लागणार असल्याने दुरुस्तीचा खर्च दिडपट होणार आहे. तरी अशा घरे, गोठे यांचे नुकसानीचे पंचनामे बाजारातील वस्तूंचे दर व दुरुस्तीसाठीची व्यावहारीक मजुरी लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे, असे तेली म्हणाले आहेत. तसेच मिळणारी नुकसान भरपाई लवकरात लवकर संबधित बाधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केंद्रीय समितीकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!