*कोकण Express*
*जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचा निर्णय राज्यासाठी आदर्शवत*
*पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी जि. प. अध्यक्षांचे केले आभार व्यक्त*
कणकवली ः (संजना हळदिवे)*
मराठी पत्रकार परिषदेने राज्य शासनाकडे पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा द्यावा अशी मागणी वारंवार केली होती. राज्यभरातील पत्रकार फिल्डवर काम करत असल्याने सर्व वयोगटातील या पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देऊन पत्रकारांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे ही मागणी राज्यातील पत्रकारां च्या वतीने राज्यपालांकडे देखील करण्यात आली होती. राज्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा फ्रन्टलाइन वर्कर मध्ये समावेश करून त्यांना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपण केली होती. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांच्या नावांची यादी देखील निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयांमध्ये पण देण्यात आली होती. मात्र 18 वर्षावरील 44 वर्षापर्यंतच्या पत्रकारांना लसीकरण सुरू करण्यात आले नव्हते. 45 वर्षावरील अनेक पत्रकारांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले आहे. जे खऱ्या अर्थाने फिल्डवर काम करणारे पत्रकार आहेत त्यांना लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याची पूर्तता होत नव्हती. जी प अध्यक्ष संजना सावंत यांनी कोणतेही आढेवेढे व कारणे न सांगता जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील पत्रकारांना कोविड चे लसीकरण करण्याचे मान्य केले व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केली. आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग या ठिकाणी पत्रकारांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. येत्या दोन दिवसात उर्वरित पत्रकार देखील या लसीकरणाचा लाभ घेतील. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पत्रकारांसाठी घेतलेला निर्णय हा स्तुत्य असून, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी दिली.

