*कोकण Express*
*‘त्या’ क्लिपमागचा खरा सुत्रधार कोण…?*
*महिला राजकारणात सुरक्षित आहेत का…?*
*या प्रकाराविरुद्ध मनसे गुन्हा दाखल करणार ; परशुराम उपरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा ‘सुसंस्कृत जिल्हा’ म्हणून राज्यभरात ओळखला जातो. त्याच जिल्ह्यातून आजी – माजी लोकप्रतिनिधींचे अश्लिल चाळे व्हिडिओमार्फत दुनियेसमोर उघडे पडत असतील, तर हा प्रकार जिल्ह्याला कलंक लावणारा आहे. राजकारणात असे प्रकार घडत असतील, तर महिला राजकारणात सुरक्षित आहेत का…? या व्हिडिओमागचा खरा सूत्रधार कोण…? या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मनसे या अश्लिल कृत्याविरोधात सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काही दिवसांपासून फिरत असणारा ‘हा’ व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासणारा आहे. तसेच अशा कृत्यांमुळे राजकारणात येवू पाहणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. यामागे कोणतं रॕकेट काम करतंय, याचा छडा लावणं गरजेचं आहे. जमिन विक्री करून पैसे कमावणाऱ्या प्रवृत्ती यामागे आहेत. या संबंधित महिलेला कोणतं आमिष दाखवून सदर कृत्य करण्यासाठी भाग पाडलं गेलंय का? तिच्यावर कोणी दबाव आणला होता का? याचाही शोध घेणं गरजेचं आहे. हे प्रकरण सर्वच राजकीय पक्षांसाठी हानीकारक आहे. परंतु कोणताच राजकीय पक्ष याकडे लक्ष का घालत नाही? ते कोणाला घाबरतात? असा प्रश्न विचारत उपरकर यांनी ‘मनसे मात्र या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी कोणी दबाव आणत असेल, तर हे प्रकरण मनसे वरिष्ठ पातळीवर नेवून त्याविरुद्ध आवाज उठवेल, असे म्हटले आहे.
याविषयी मनसे दोन दिवसात पोलिस अधिक्षकांकडेही निवेदन देणार आहे. सावंतवाडीच्या DYSP एक महिला आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा छडा लावणं गरजेचं आहे.
तसेच व्हिडिओशी संबंधित असलेल्या व्यक्तीला आणि कुटुंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकल्याचे सोशल मिडियावरून समजले आहे. हा प्रकारही निंदनीय आहे. त्याविरूद्धही योग्य तो निर्णय घेतला जावा. तसेच हा विषय आता गावपातळीवर न राहता तो सामाजिक झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.