इन्सुलीत दारुसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुलीत दारुसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

*कोकण Express*

*इन्सुलीत दारुसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*इन्सुली पथकाची कारवाई*

*बांदा ः प्रतिनिधी*

गोव्यातून मुंबईच्या दिशेने बेकायदा दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील पथकाने कारवाई करत एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुरत (गुजरात) येथील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा इन्सुली कार्यालयासमोर करण्यात आली.

इन्सुली नाका येथे गोव्यातून येणाऱ्या (जी. जे.११-व्हीव्ही ०४६६) बोलेरो पिकअप या टेंपोला तपासणीसाठी थांबविण्यात आले. या टेंपोच्या मागील हौद्यात नारळाखाली लपवून ठेवलेले विविध ब्रॅंडचे ५ लाख ५४ हजार ४०० रुपये किंमतीचे ५६ विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी वापरण्यात आलेला १० लाख रुपयांचा महिंद्रा पिकअप टेंपो व इतर ३० हजार ३०० रुपयांचे साहित्य असा एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई  राज्य उत्पादन जिल्हा अधिक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, जवान रमेश चंदूरे, शरद साळुंखे, चालक संदीप कदम, शिवशंकर मुपडे आणि विशेष पथकाचे दुय्यम निरीक्षक सचिन यादव, जवान अमर पाटील यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!