*कोकण Express*
*जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्ण 4773 पैकी केवळ 1097 रुग्ण सद्यस्थितीत CCC, DCHC, DCH मध्ये दाखल आहेत..*
*शासकीय व खाजगी रुग्णालयात अजुनही 488 बेड शिल्लक असताना उर्वरित 3676 पैकी सक्रिय रुग्ण शासन का दाखल करत नाहीय याच उत्तर कोण देणार..??*
*सचिव, आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर*
गृह विलागिकरण बंद करण्याच्या निर्णयाला 3 दिवस झाले तरी जिल्ह्यातील 3676 कोविड रुग्ण गावातच सुरू होणाऱ्या CCC केंद्राची जीव वाचवण्यासाठी डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत..
आपल्या जिल्ह्यात 431 अधिकृत ग्राम पंचायती असून सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून अंदाजे 3720 लोक प्रतिनिधी आहेत.. तसेच 100 पंचायत समिती सदस्य व 50 जिल्हा परिषद सदस्य असे एकत्रित मिळून 3870 लोक प्रतिनिधींना कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कधी विश्वासात घेणार..??
गेले अनेक महिने ही सर्व लोक जिवाचं रान करून गावातील प्रत्येक नागरिकाला वाचविण्यासाठी धडपडत आहेत पण शासन यांना सहकार्य करत नाही हे वारंवार त्यांनी अनेक बैठकांमध्ये लेखी तसेच तोंडी खंत व्यक्त केली आहे.. शासनाकडे जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा याच ग्राम नियंत्रण समितीच्या डोक्यावर अडचणींचा डोंगर टाकून आपण नामानिराळे राहण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने किमान दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात तरी करू नये असं वाटतं..
जिल्हा प्रशासनाकडे सत्ता, अधिकार, मनुष्यबळ आणि आर्थिक निधी असूनही सूक्ष्म नियोजनाचा अभाव असल्यामुळेच 639 स्थानिक नागरिकांचा हकनाक बळी गेला..
ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधी यांनी व्यक्त केलेल्या अडचणी, समस्या, भावना तसेच उपाय योजना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जिल्हा प्रशासनाला कोणता आसुरी आनंद मिळतोय हे त्यांनाच माहीत.. सिंधुदुर्ग जिल्हा आज संपूर्ण राज्यात कोरोना आकडेवारी मध्ये 7 व्या नंबर ला आहे याच काहीच कसं या शासकीय अधिकाऱ्यांना वाटत नाही..
431 सरपंचांना जर शासकीय नियमांचा धाक दाखवून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक गावातील सर्व नागरिक त्या सरपंचाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात कोणतीही शंका नाहीय..
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आरोग्य विभाग हा अनुनभवी व्यक्तींकडे असल्यामुळेच आपल्या जिल्ह्याची वाताहात झालेली दिसून येते त्यामुळे आरोग्य विभाग हा ज्येष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची वेळ आलीय नाहीतर जिल्ह्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत निष्पाप लोकांचा जीव जाणार आणि शासकीय अधिकारी फक्त मेलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करत बसणार..
मान. आरोग्यमंत्री सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यात प्रत्यक्ष भेटून प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व त्याच बरोबर दोषी, कामचुकार, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुध्धा उगारला मग आमच्या जिल्ह्यात आरोग्य मंत्र्यांचा शासकीय दौरा कधी होणार याची जिल्हावासिय आतुरतेने वाट पाहत आहेत..
जिल्ह्यात 20 कोटी पेक्षा जास्त निधी कोरोना विरूध्द लढाई साठी आला मग वेंगुर्ला शहरात मागील 15 महिन्यात साधा एक ऑक्सिजन बेड सुरू करता आला नाही याच श्रेय नक्की कोणाला द्यायचं हा यक्ष प्रश्न सर्वांना पडला आहे..
काहीच जमत नसेल तर सिंधुदुर्ग जिल्हा किमान गोवा राज्यामध्ये विलीन करा म्हणजे चांगली, दर्जेदार आरोग्य यंत्रणा जिल्हा वासियांना उपभोगायला भविष्यात पुढच्या पिढीला तरी मिळेल..

