*कोकण Express*
*मालवण पालिकेची धडक कारवाई*
*पालिकेच्या भरारी पथकाकडून सलग तिसऱ्या दिवशी ११ दुकानांवर कारवाई ; ९ हजाराचा दंड वसूल…*
*मालवण ः प्रतिनिधी*
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवावी अशी सूचना आहे. असे असताना गेल्या ३ दिवसात वेळेनंतर दुकाने सुरु ठेवलेल्या बाजारपेठेतील अनेक दुकानांवर पालिकेच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत ९ हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती भरारी पथक प्रमुख गीतांजली नाईक यांनी दिली.
शहरातील बाजारपेठेतील भाग्यश्री हॉटेल, सुजाता टाईम सेंटर, कुडाळकर ज्वेलर्स, विजया बेकरी, हॉटेल भाई भाई, भाजी दुकाने, भावेश जनरल स्टोअर्स, पानपट्टी दुकाने, जय अंबे स्वीट मार्ट अशा ११ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक प्रमुख गितांजली नाईक आणि विजय रावले, बस्त्याव फर्नांडीस, वीणा पारधी, अनिकेत चव्हाण, रत्नकांत गावकर, जीवन जोगी यांच्या पथकाने केली.
दुकाने बंद करण्याबाबत दोन-तीन वेळा सूचना करूनही संबंधित दुकानदारांनी दुकाने सुरु ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. मालवण पालिकेने याबाबत शहरात वेळोवेळी रिक्षा फिरवून जनजागृती केली होती. यापुढे दुकानदारांकडून नियोजित वेळेनंतर दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकाने कायमस्वरूपी सक्तीने सील करण्यात येतील आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा करण्यात येईल अशी माहिती भरारी पथक प्रमुख श्री. नाईक यांनी दिली.