सत्ताधाऱ्यांची असमर्थता पारकरांनी मान्य केलीय का

सत्ताधाऱ्यांची असमर्थता पारकरांनी मान्य केलीय का

*कोकण Express*

*सत्ताधाऱ्यांची असमर्थता पारकरांनी मान्य केलीय का…?*

*‘आधी पाहणी केलेले कोविड सेंटर सुरु करा नंतरच सेवेच्या गोष्टी करा’*

*नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा संदेश पारकर यांना टोला*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

सरकारकडे मागणी ही विरोधकांनी करायची असते. तर सत्ताधाऱ्यांनी जनतेला काम करून दाखवायचे असते. असे असताना शिवसेनेचे संदेश पारकर यांनी 1 हजार बेडची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पण त्याच पारकर यांच्या पक्षाकडून कणकवली शहरातील वाळकेश्वर मंगल कार्यालयामध्ये कोविड सेंटर करण्याकरिता प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांना सोबत घेऊन पाहणी केली होती. त्यावेळी श्री. पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर व नगरसेवक सुशांत नाईक यांनी त्या हॉल मध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर कणकवली शहरवासियांना संदेश पारकर यांनी द्यावे, असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर व भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, हे पारकर यांनी मान्य केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण सत्ताधारी आरोग्य व्यवस्था सक्षम करू शकत नाहीत, हे पारकर यांनी मान्य केले. त्यामुळे ते नेमके सत्ताधारी आहेत की विरोधक त्याचा अभ्यास अगोदर त्यांनी करायला हवा. तसेच मोठा गाजावाजा करून संदेश पारकर यांनी मुडेश्वर मैदानाजवळील वाळकेश्वर हॉलमध्ये कोविड सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी त्या कोविड सेंटरची पाहणी देखील केली होती. मात्र महिना उलटून गेला तरी ते कोविड सेंटर सुरू झाले नाही. मग केवळ तो पाहणी दौरा फोटो पुरताच होता का? असा सवाल श्री. परुळेकर व कोदे यांनी केला आहे.

संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे जी मागणी केली, ती मागणी विरोधकांनी करायची असते. सत्ताधारी काम करत नाहीत म्हणून पारकर यांनी ही मागणी केली असं समजायचं का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. शिवसेना केवळ जनतेला आम्ही काम करतो हे दाखवण्यासाठी मागणी करण्याचा स्टंट करत आहे, असा टोला श्री. परुळेकर व कोदे यांनी लगावला.

शिवसेनेला जर कणकवली शहरातील लोकांसाठी काम करायचं असेल, तर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केलेले ते कोविड सेंटर सुरू करून दाखवावे व नंतरच कणकवली शहरवासीयांच्या सेवेच्या गोष्टी कराव्यात, असाही जळजळीत टोला शिशीर परुळेकर व भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी पारकर यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!