पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ग्रामीण भागातही लक्ष द्यावा: दादा साईल

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ग्रामीण भागातही लक्ष द्यावा: दादा साईल

*कोकण  Express*

*पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ग्रामीण भागातही लक्ष द्यावा: दादा साईल*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी फक्त कुडाळ शहरात आणि हायवेवर उभं राहून नाकाबंदी करण्याबरोबर ग्रामीण भागात देखील लक्ष द्यावे असे भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी सांगून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधणार असून पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात समूह संसर्गाची वाढती भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

गेले जवळपास 2 महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. मागच्या वेळेपेक्षा आताच्या लाटेची स्थानिक लोकांना प्रचंड दाहकता जाणवत आहे. या वेळेस कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे आणि मृत्युचे प्रमाण वाढले आहे. राज्यसरकाने 13 एप्रिल मध्यरात्री पासून संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू केले आहे. यामध्ये सकाळी 7 ते 11 या वेळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूच प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त असून देखील नागरिकांमध्ये नियम पाळण्याची अनास्था दिसून येते. आपल्या कुडाळ तालुक्यात कुडाळ शहर वगळता अन्य ग्रामीण भाग आहे. याठिकाणी ग्रामपंचायतीवर कोरोना नियंत्रणासाठी जबाबदारी सरकारने सोपवली आहे. कोणत्याही  ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर पोलीस दलाची मदत आवश्यक असते. परंतु कुडाळ तालुक्यात कुडाळ, ओरोस आणि निवती अशी 3 पोलीस ठाणी असून देखील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्तरारीय नियंत्रण समित्यांना ग्रामस्थां बरोबर वादावादी करावी लागते तरी देखील ग्रामस्थ ऐकत नाहीत अशी अवस्था आहे आणि यामुळेच बऱ्याच गावात समहू संसर्ग सुरू झाला आहे.

यासाठी पालकमंत्री, आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सर्व सरपंच यांनी मागणी केल्यावरून पालकमंत्री महोदयांनी ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठत पूर्णवेळ किमान सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि होमगार्ड देण्याचे आदेश कुडाळ पोलीस निरीक्षक यांना दिले होते. परंतु पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी या आदेशाला हरताळ फासत फक्त कुडाळ शहरात आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. संध्याकाळी हायवेवर उभे राहून हायवेवर जाण्याऱ्या गाड्या विनाकारण अडवत “सिंघमगिरी” दाखवण्याचा प्रयन्त करत आहेत. कुडाळ शहरातील प्रत्येक नाक्यावर किमान 4 पोलीस कर्मचारी आणि 4 होमगार्ड विनाकारण बसवून ठेवत ग्रामीण भाग मात्र वाऱ्यावर सोडून दिला आहे. त्यामुळे बाजारपेठ असलेल्या ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण शहरापेक्षा अधिक आहे.

त्यामुळे कुडाळ पोलीस निरीक्षकांनि कुडाळ शहरात नाकाबंदी करण्या बरोबरच ग्रामीण भागातील किमान बाजारपेठेत तरी पूर्ण वेळ बंदोबस्त द्यावा अन्यथा ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था आणि कोरोना रुग्ण वाढीस जबाबदार असाल असा इशारा भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!