विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री यांची भेट झाली तर त्यात वावगं काय? – आ. वैभव नाईक

विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री यांची भेट झाली तर त्यात वावगं काय? – आ. वैभव नाईक

*कोकण Express*

*विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री यांची भेट झाली तर त्यात वावगं काय? – आ. वैभव नाईक*

*कणकवली ःः(संजना हळदिवे)*

ना. उदय सामंतहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आहे. गेली २० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांचे काही म्हणणं असेल विरोधी आमदार यांच्या काही सूचना असतील तर त्यासंदर्भात चर्चा करून नुकसान ग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी ना. उदय सामंत यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर संकट काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास संकटावर मात करणे सोपे जाते. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील म्हणणे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ना. उदय सामंत यांच्यात भेट झाली, तर त्यात वावगं काय, असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले आहे.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, सध्या निवडणुकीचा कालावधी नाहीय त्यामुळे वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेले नेत्यांचे दौरे हे राजकीय दौरे नसून लोकहितासाठीच आहेत. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ना. उदय सामंत यांच्यात भेट झाली. खरतर राणे कुटुंबाची हि संस्कृतीचं आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून त्यामुळेच राणेंची नेहमी तळमळ सुरु असते. नारायण राणे मंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाला दुय्यम स्थान द्यायचे विरोधी पक्षांनी सुचविलेली कामे डावलून टाकायचे. भर बैठकीत विरोधी आमदारांचा अपमान करायचे. परंतु ना. उदय सामंत हे सुसंस्कृत नेते आहेत. विरोधी पक्षाचे म्हणणं ते जाणून घेतात.

ना. उदय सामंत यांच्यासोबत काम करताना गेल्या वर्षभरात अनेक विरोधी सदस्य त्यांच्या संपर्कात असतात. मात्र राणे कुटुंबियांना हे कळलं कि त्यांची जळफळाट सुरु होते. मग त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु होतात. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत हे करण शक्य नसल्याने निलेश राणेंनी ट्विटरवर आपला जळफळाट व्यक्त केला. निवडणुकीपुरतं राजकारण त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या या महामारीत सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. परंतु, निलेश राणे यांच्या खोडसर वृत्तीमुळे राजकीय पक्ष एकत्र येणार नसून कायमच राजकारण करण्याचं काम करणार आहेत. सिंधुदुर्गात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवाद नसल्याने राजकीय राडे, हत्या झाल्या आहेत. हे संवाद घडून आले पाहिजेत, म्हणूनच उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात काही गैर नाही त्यांनी असाच पुढाकार घ्यावा. आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी कायम राहीन, उद्धवजी ठाकरे यांच्या मनात याबाबत कोणतीही शंका नाहीय सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे असून या संकटातून कोकण वासियांना बाहेर काढायचे आहे. असेही आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!