*कोकण Express*
*”तोक्ते” वादळ नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…*
*वादळानंतरच्या व्यवस्थापनाबाबत अनेक मुद्यांवर वेधले जिल्हाप्रशासनाचे लक्ष…*
*तातडीने वीज जोडण्या पूर्ववत करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मनसेची सूचना..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तोक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाकार माजवल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचा पाहणी दौरा करून झालेली नुकसानी व प्रशासकीय मदतकार्य याचा आढावा घेऊन आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. माजी आमदार नितीन सरदेसाई, नेते शिरीष सावंत,माजी आमदार जीजी उपरकर, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर आदी शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी परशुराम उपरकर यांनी दरवर्षी वादळसदृश्य परिस्थिती उद्भवणार व किनारपट्टीवर बंधारे नसल्याने कायम नुकसानी होतच राहणार याकडे लक्ष वेधले. त्यावर जिल्हाधिऱ्यांनी जिओ ट्यूब बंधारे बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. यावर नितीन सरदेसाई यांनी जिओ ट्यूब बंधारे यशस्वी झाल्याचे देशात कुठेही उदाहरणे नसल्याचे लक्ष वेधले. तसेच सामाजिक संस्था व राजकीय पक्ष किनारपट्टी भागात पिण्याचे पाणी पुरवठा करत आहेत मात्र त्यासोबतच प्रशासनाकडून पाणी पुरवठा झाल्यास मदतकार्य अधिक व्यापक होईल असे सांगितले.शिरीष सावंत यांनी भूमिगत वीज जोडणीकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे सांगितले व प्रशासनाने किनारपट्टी भागातील विहिरीची सफाई करून निर्जंतुकीकरण करून देण्याची मागणी केली. नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करणे, वीज जोडणी तातडीने पूर्ववत करणे,आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकाची नेमणूक करने आदी मागण्या मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनासमोर ठेवून सकारात्मक चर्चा केली.यावेळी मनसे युवानेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम दर्जाचे मास्क जिल्हा प्रशासनाला आपत्ती निवारण कामी भेट देण्यात आले.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,राजेश टंगसाळी,धीरज परब, दया मेस्त्री,संतोष सावंत,संतोष मयेकर,दिपक गुराम,सचिन ठाकूर,जगन्नाथ गावडे,अमोल जंगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.