*कोकण Express*
*भारतात स्पुटनिक कोविड-19 लसीचे उत्पादन येत्या ऑगस्टपासून सुरु होणार..*
सेंट पीटर्सबर्ग, रशिया (22 मे, ANI च्या हवाल्यानुसार)- भारताचे रशियामधील राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी भारतात येत्या ऑगस्ट महिन्यापासून स्पुटनिक या कोविड-19 लसीचे उत्पादन सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की आतापर्यंत रशियाने सुमारे २ लाख स्पुटनिक लसींचा भारताला पुरवठा केला आहे.
याप्रसंगी बोलतांना वर्मा म्हणाले, “अगोदर दीड लाख आणि नंतर साठ हजार अशा खेपेतून भारताला लसी मिळाल्या आहेत. या मेच्या शेवटी भारताला ३० लाख इतका लसींचा साठा मिळेल. जूनमध्ये याची संख्या तब्बल 50 लाखांपर्यंत वाढेल. नंतर थेट ऑगस्टमध्ये भारतातच याचे उत्पादन सुरु होईल.” त्यांनी पुढे असंही सांगितलं की “भारतात एकूण तीन टप्प्यांत स्पुटनिक लसीचे उत्पादन केले जाईल. पहिल्या टप्प्यात, रशियात बनवलेल्या लसीचा पुरवठा अगोदरच सुरु आहे.
त्यानंतरच्या टप्प्यात, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF)च्या मदतीने भरपूर मोठा साठा भारतात येईल. परंतु, हा साठा बॉटल्समध्ये भरून वितरित करावा लागेल. तिसऱ्या टप्प्यात, रशिया लसीचे तंत्रज्ञान कोणत्याही एका भारतीय कंपनीला हस्तांतरित करेल आणि पूर्णपणे स्वबळावर तिचे उत्पादन करू शकेल. या सर्व टप्प्यांमध्ये एकूण ८५० दशलक्ष इतक्या लसींची निर्मिती केली जाईल.”
स्पुटनिक-V या लसीची भारतात यावर्षी एप्रिलमध्ये नोंदणी झाली होती. भारताचे रशियातील राजदूत पुढे म्हणाले, “भारत सरकारला आशा आहे की रशियाच्या स्पुटनिक लाईटच्या लसीकरणाला भारतात परवानगी मिळेल. रशियाने भारताकडे या लसीच्या वापराचा प्रस्ताव दिला आहे. अजून परवानगीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एकदा परवानगी मिळाली की भारत व रशिया यांचा सहकार्य करार आणखी बळकट होईल.
रशियन लसीचे परदेशात मार्केटिंग करणाऱ्या RDIF च्या मते, “स्पुटनिक लाईट हा स्पुटनिक-V कोरोना व्हायरस लसीचा पहिला घटक आहे. याचे इंजेक्शन दिल्यानंतर २८ दिवसांनी विश्लेषण केलेल्या माहितीच्या आधारे 79.4% एवढी परिणामकारकता दिसून आली आहे. ही इतर कोणत्याही दोन डोस देणाऱ्या लसीपेक्षा ८०% जास्त आहे.”