*केंद्राच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राज्य शासनाने कोकणाला सढळ मदत करावी*
*केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे मत**कुडाळ ः प्रतिनिधी*कोकणाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे. केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोकणवासीयांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री आठवले हे आज एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. आज जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते कुडाळ मध्ये आले होते. यावेळी ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात विविध ठिकाणी आपण नुकसानीची पहाणी केली. यापूर्वी कधी झाले नव्हते एवढे मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदार, शेतकरी, मच्छिमार यांचे या वादळाने पुरते कंबरडे मोडले. राज्य सरकारने कोकण वासियांना सढळ हस्ते मदत करावी. प्रत्येकवेळी केंद्राला लक्ष्य न करता तसेच आपली जबाबदारी केंद्राकडे न ढकलता जबाबदारी ओळखून काम करावे. मी याबाबत अहवाल पाठवून महाराष्ट्रातील आम्ही सर्व जास्तीजास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच महाराष्ट्रातील आम्ही सर्व मंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे मदतीची करण्याची मागणी करण्यात येणार आहे. गुजरातला केंद्र सरकारने १०००कोटीची मदत दिली. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील नुकसानीची आकडेवारी फार मोठी आहे. शेतकऱ्यांना ताकद देणे काळाची गरज आहे. गुजरातपेक्षा जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रतन भाऊ कदम, रमाकांत जाधव, तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.