देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

*कोकण Express*

*देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून*

*एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता*

*सिंधुदुर्गनगरी दि.१७-:*

तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, रा.रत्नागिरी, विलास सुरेश राघव, रा. पुरळ – कळंबई, ता. देवगड, सूर्यकांत सायाजी सावंत, रा. हुंबरठ, ता. कणकवली हे सुखरूप बाहेर आले आहेत. याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी 3.30 वा. सुमारास आंनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे कळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!