*कोकण Express*
*चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील ३८ गावांना “अलर्ट” राहण्याच्या सूचना…*
उदय सामंत; जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण,मृत्यूची संख्या कमी करण्यास यश येत असल्याचा दावा*
*सावंतवाडी, ता. १४ :*
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील ३८ गावांना “अलर्ट” राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वादळाचा काळ तीन दिवसाचा आहे. त्यामुळे किनारपट्टीसह जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण, मृत्यूचा दर आणि पॉझिटिव्ह सॅम्पलची संख्या कमी करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार लोकांचा घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाला भविष्यात निश्चितच हद्दपार करण्यासाठी आम्हाला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. सामंत यांनी आज येथे झूम ॲपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले येणारे चक्रीवादळ धोकादायक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याची यंत्रणा काम करत आहे. मात्र किनारपट्टी सह जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. गरज भासल्यास काही भागातील लोकांना स्थलांतर करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी पुणे येथील इंडिया एन.डी.आर.एफच्या टीमला पाचारण करण्यात आलेले आहे. आम्ही सतर्क आहोत मात्र परिस्थिती तशीच निर्माण झाल्यास प्रशासनाला लोकांनी सहकार्य करावे. त्यांच्याशी हुज्जत घालू नये असेही आवाहन त्यांनी केले. लाॅकडाऊन संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आज, उद्या निर्णय जाहीर करतील रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे कठोर निर्बंध तसेच राहतील. त्यामुळे लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जिल्ह्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होईल त्यामुळे तुटवड्यावरून निर्माण झालेला प्रश्न दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.