*कोकण Express*
*कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार*
*कोल्हापूर*
जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीसह सर्व उद्योग, कारखाने येत्या रविवारपासून पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी दिली.सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार, १५ मे ते रविवार, २३ मेपर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाहीर केली. शनिवारी मध्यरात्रीपासून २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.