*कोकण Express*
*खारेपाटण चेकपोस्ट येथून २३ दिवसात ११,६४७ एवढे नागरिक जिल्ह्यात दाखल*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर व मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या खारेपाटण येथील जिल्हा तपासणी नाका अर्थात खारेपाटण चेकपोस्ट येथून आज शनिवार दि.८/५/ २०२१ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत सुमारे ११६४७ एवढे बाहेरील नागरीक सध्या जिल्ह्यात दाखल झाले असून आरोग्य पथक,महसूल पथक व पोलीस प्रशासन हे खारेपाटण चेकपोस्ट येथे मुंबई वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खारेपाटण सरपंच तथा ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी जनतेला केले आहे.
खारेपाटण चेक पोस्ट येथे जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या पर जिल्ह्यातील नागरिकांपैकी २२८ नागरिकांची आता पर्यंत रॅपिड टेस्ट करण्यात आली असून यापैकी आजपर्यंत फक्त ७ व्यक्तीची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती येथील आरोग्य पथकातील डॉ.आश्विनी घुगे यांनी दिली.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला असून तेवढयाच दुपटीने उष्णतेचे प्रमाण देखील प्रचंड वाढल्याने मुंबई वरून गावी येणाऱ्या चाकरमानी वर्गाची संख्या ही सध्या रोडावलेली असुन गावी जाऊन १४ दिवस होमक्वारंटाईन राहण्यापेक्षा मुंबई येथेच थांबण्याचे कोकणातील बहुतेक मुंबईस्थित नागरिकांनी ठरवले असल्याचे चित्र साध्य जाणवत आहे. यामुळे खारेपाटण चेकपोस्ट वर मुंबईवरून येणारी माणसाची गर्दी आता थांबली असली तरी देखील कोरोनाच्या काळात दिवसाला २५० नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत.
खारेपाटण चेक पोस्ट येथील कर्मचारी सकाळी ८ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशी सलग तीन पाळ्यामध्ये काम करीत असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने येथील कर्मचारी वर्गाला चहा नाष्टा तसेच पिण्याचे पाणी व सॅनिटायझर,पीपीइ किट,मास्क या वस्तू पुरविल्या जात आहेत.
खारेपाटण चेकपोस्ट येथे सध्या महसूल व आरोग्य पथकात खारेपाटण हायस्कुलचे शिक्षक संजय सानप,सुरेश करांडे, संगाप्पा गुरव,अजय गुरसाळे,रामचंद्र लोके,दयानंद कोकाटे,सतीश नाईक,संतोष राऊत,महेंद्र चिंगळे याबरोबरच डॉ.सीमा अतिग्रे व डॉ.आश्विनी घुगे काम करत आहेत. तर खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस उद्धव साबळे,पराग मोहिते, सुयोग पोकळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करीत आहेत.