*कोकण Express*
*सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचे ‘ते’आदेश खोटे..*
*जिल्हाधिकाऱ्यांची बदलीच्या त्या आदेशाची कसून चौकशी व्हावी-परशुराम उपरकर…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचे आदेश मंत्रालय पातळीवरून प्राप्त झाल्याचे सोशल मीडियावर रविवारी फिरत होते. मात्र नंतर हे आदेश खोटे असल्याचे पुढे आले असून याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत संपूर्ण प्रकाराची चौकशी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या मुळापर्यंत जात दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. याबाबत श्री उपरकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठविले असून यात म्हटले आहे की जे बदलीचे आदेश प्राप्त झालेले आहेत ते पाहता यात वरिष्ठ पातळीवरून छेडछाड होऊन गैरसमज पसरविण्याचा उद्देशाने हे आदेश काढण्यात आले असावेत असे वाटते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कोरोना काळात अपुऱ्या सुविधा असतानाही योग्य प्रकारचे नियंत्रण ठेवण्याचे काम दोन्ही जिल्हाधिकारी करत आहेत. असे असताना त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी हे फेक आदेश काढण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या पाठीमागे कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा दोन नंबरवाले किंवा अन्य कोणी आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आदेश फिरल्यानंतर अशाप्रकारे प्राप्त आदेशाबाबत लोकांमध्येही गैरसमज निर्माण झालेले आहेत. हे आदेश मंत्रालयातील ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने निघालेत त्याबाबत अधिकृत वेबसाईटवर कोणत्याही आदेशाचा उल्लेख नाही. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याच्या हेतूने हा प्रकार घडला असावा असे दिसते. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य कोणी यात असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फेक आदेश ज्या पद्धतीने पसरविण्यात आले त्याबाबत पूर्णता चौकशी करून त्याच्या मुळाशी जात असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे. तसेच याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ही मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात आपण उपसचिव सरिता बांदेकर यांच्याशी बोललो असून त्यांनी डिसेंबर पासून आपण त्या जागी नाही आपली अन्यत्र बदली झाली असल्याचे सांगितले तसेच त्यांच्या जागी कार्यरत असलेले उपसचिव अजित पाटील यांच्याशी ही आपण बोललो असून त्यांनीही या प्रकरणी मुळाशी जात कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.