*कोकण Express*
*मालवणात सर्वपक्षीय बैठकीत “जनता कर्फ्यू” बाबत चर्चा*
*पालिका आणि व्यापाऱ्यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा : आ. वैभव नाईक यांचे आवाहन*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ. वैभव नाईक यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शहरात सात दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यकच असल्याचे प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांनी सांगितले. तर याबाबत पालिका आणि व्यापाऱ्यांनी एकत्र बसून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन आ. नाईक यांनी केले.
आ. वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आयोजित या बैठकीला प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी, सुदेश आचरेकर, यतीन खोत, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, व्यापारी संघाचे शहराध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेट्ये, रवी तळाशीलकर, हर्षल बांदेकर, दर्शना कासवकर, बाळू अंधारी, मेघा सावंत, विजय चव्हाण, संतोष नांदगावकर, महेश कारेकर, मत्स्यव्यवसायच्या अधिकारी श्रीमती करंगुटकर यांच्यासह अन्य व्यापारी आणि अधिकारी उपस्थित होते.
आरटीपीसीआर अहवाल आता ४८ तासांत मिळणार: वैभव नाईक यांची ग्वाही
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी जिल्हा रुग्णालयातून स्वाबच्या आरटीपीसीआर टेस्टचा रिझल्ट सात दिवसांनी येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा रिझल्ट येईपर्यंत तो माणूस शहरात सर्वत्र फिरतो. त्यामूळे शहरातील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे रिपोर्ट लवकरात लवकर मिळावे आणि टेस्ट झाली की त्या व्यक्तीना विलीगिकरण कक्षात ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच शहरातील पालिकेच्या मालकीचे सार्वजनिक संडास त्या भागात रुग्ण मिळाल्यानंतर त्वरित सॅनिटाईझ करण्यात यावे, अशीही त्यांनी मागणी केली. या अनुषंगाने बोलताना आ. वैभव नाईक यांनी आरटी पीसीआरचे रिपोर्ट विलंबाने येण्याचा प्रश्न मिटला असून ३० एप्रिल पर्यंतचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. यानंतर दोन दिवसांतच रिपोर्ट मिळण्याबाबतची व्यवस्था करण्यात आली असून ४८ तासात रिपोर्ट न मिळाल्यास माझ्याशी किंवा प्रांताधिकारी मॅडमशी संपर्क साधा, अशा सुचना आ. वैभव नाईक यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
जनता कर्फ्यू बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा
शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत असल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली. ग्रामीण भागात सकाळी ११ नंतर दुकाने सुरू असतात, त्याकडे पोलिसांनी लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली. या अनुषंगाने बोलताना व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सकाळी ७ ते ११ ही वेळ चुकीची असून बाजारात लोक साधारणतः सकाळी ९ वाजल्यानंतर येत असल्याने ही वेळ ९ ते १ करावी, अशी मागणी केली. व्यापारी म्हणजे शत्रू नव्हे, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, व्यापारी प्रशासनाला सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहेत, असे सांगितले. तर नितीन तायशेट्ये यांनी सात दिवस बंद ठेवून काय साध्य होणार ? असा सवाल केला. लोकं दुकानात न येता देखील बाजारात गर्दी करतात, त्यामुळे लॉकडाऊन करायचा तर संपूर्ण बंद करा, नाहीतर काहीच उपयोग होणार नाही, असं सांगितलं. या अनुषंगाने बोलताना प्रांताधिकारी सौ. खरमाळे यांनी ७ दिवस बंद ठेवल्यास कोरोनाची चैन ब्रेक होईल, त्यामुळे व्यापाऱ्यांनी विचार करून निर्णय घ्यावा, दुकानं बंद ठेवली तर लोकं बाहेर येणारच नाहीत, त्यानंतर अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करील, असेही प्रांताधिकारी म्हणाल्या.
मालवणात आणखी १० बेड उपलब्ध करण्याची सूचना
मालवणमध्ये कोरोनाचे रुग्ण मिळून येत असल्याने याठिकाणी आणखी १० बेड उपलब्ध करून देण्याची सूचना आ. वैभव नाईक यांनी केली. या सेंटरचा कार्यभार ग्रामीण रूग्णालयाने बघण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी सुदेश आचरेकर यांनी ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.