*कोकण Express*
*गोवा राज्यातून कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न उधळला ; बांदा तपासणी केंद्रावरील कर्मचार्यांची सतर्कता*
*बांदा ः प्रतिनिधी*
गोवा राज्यातून महाराष्ट्रात अहमदनगर येथे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्याचा प्रयत्न बांदा तपासणी नाक्यावरील कर्मचार्यांनी हाणून पाडला. रुग्णांना नेणारी रुग्णवाहिका बांदा सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवून ठेवली. याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिल्यानंतर त्यांनी सदर रुग्णवाहिक पुन्हा गोव्यात नेण्याचे आदेश दिले.
आज सायंकाळी चार रुग्णांना घेऊन गोव्यातून ओम्नी रुग्णवाहिका बांदा तपासणी नाक्यावर आली. नाक्यावरील कर्मचार्यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णवाहिकेतील रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. विषय गुंतागुंतीचा असल्यामुळे या प्रकरणाची माहिती सावंतवाडी तहसीलदारांना देण्यात आली. तहसीलदार म्हात्रे यांनी सर्वांची समजूत काढून रुग्णवाहिका परत गोव्यात नेण्याचे निर्देश दिले. अखेर रुग्णवाहिका पुन्हा गोव्यात गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.