कणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोकण  Express*

*कणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद!*

*पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युच्या आदेशाचे कडेकोड पालन!*

*नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधीच्या आवाहनाला शहरवासीयांनी दिली साथ!*

*शहरातील गल्ली बोळात निरव शांतता!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरात १ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरपंचायत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत हा जनता कर्फ्यु १००% यशस्वी केला. जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात बँका, शासकीय कार्यालये, औषधालये, रुग्णालयातील कर्मचारी वगळता कोणीही व्यक्ती रस्त्यावर फिरलेली दिसत नव्हती. सर्वच आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे चौक – चौकातील रस्त्यावर निरव शांतता पाहायला मिळाली.

न.पं.कडून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात बैठक पार पडली होती. या बैठकीत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून १० दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी पहिल्या दिवशी या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वयंपूर्तीने तंतोतंत पालन करत घरी राहणे पसंत केल्याने या आव्हानाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

यामुळे १० दिवस अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि संसर्ग साखळी खंडित व्हावी म्हणून या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यापुढील दिवशी या जनता कर्फ्युला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!