वायंगणी-वेंगुर्ले किनाऱ्यावर उद्या “कासव महोत्सव २०२६”चे भव्य आयोजन.

वायंगणी-वेंगुर्ले किनाऱ्यावर उद्या “कासव महोत्सव २०२६”चे भव्य आयोजन.

*कोंकण एक्सप्रेस*

*वायंगणी-वेंगुर्ले किनाऱ्यावर उद्या “कासव महोत्सव २०२६”चे भव्य आयोजन…*

*कासव पिल्लांचा जन्मोत्सव अनुभवण्याची मिळणार संधी..*

*खास. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती..*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

कासव संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि समुद्री जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्र किनाऱ्यावर शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ‘कासव महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
कांदळवन विभाग, दक्षिण कोकण अंतर्गत वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण यांच्या विद्यमाने वायंगणी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हा महोत्सव वायंगणी येथे होत आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सकाळी ७.३० वाजता मान्यवरांचे आगमन व स्वागत होईल. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या शुभहस्ते समुद्रात सोडण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता वाळूशिल्पाचे फीत कापून उद्घाटन करण्यात येईल. पुढे ९.०० वाजता कार्यक्रमाचे प्रास्ताविक, ९.३० वाजता कासव संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘कासव मित्रांचा’ सन्मान, ९.४५ वाजता कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, १०.०० वाजता मान्यवरांचे मनोगत आणि १०.३० वाजता आभार प्रदर्शन असा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास आम. श्री. निरंजन डावखरे, आम. श्री. दिपक केसरकर, आम. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आम. श्री. नितेश राणे, अध्यक्ष, जि. प. सिंधुदुर्ग श्री. प्रमोद कामत या मान्यवरांसह कांदळवन कक्ष, मुंबई चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर च्या श्रीमती श्रीलक्ष्मी ए., सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती घोडमिसे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक, सावंतवाडी चे श्री. मिलिश दत्त शर्मा, श्रीमती मधुमिता एस. (उप वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई) तसेच श्रीमती कांचन पवार (विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग, कोकण क्षेत्र, अलिबाग) आदी प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवन) मालवण श्री. महादेव शिंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवन), प्रियांका पाटील सहाय्यक वन संरक्षक, कांदळवन विभाग दक्षिण कोकण, श्री. सुनील सावंत, वनपरिमंडळ अधिकारी कांदळवन वेंगुर्ला, वायंगणी सरपंच श्री. दत्तराम उर्फ अवि दुतोंडकर करीत आहेत. या महोत्सवाला पर्यटकांनी आणूननागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!