*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली; नागरिकांत नाराजी*
*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अन्य फिजिशियन डॉक्टर ची नेमणूक करून डॉ. रेड्डी यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा रुजू करण्याची मागणी*
*कणकवली वासियांची पालकमंत्र्यांनाही हाक*
*कणकवली ः संजना हळदिवे*
येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली असून, यामुळे कणकवलीतील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत दर्जेदार व समर्पित सेवा दिली होती. रुग्णांच्या समस्या समजून घेत त्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. आपत्कालीन परिस्थितीतही ते तातडीने रुग्णालयात दाखल होत रुग्णांना सेवा देत असल्याने अनेकांचा त्यांच्यावर विश्वास होता.
त्यांच्या बदलीची बातमी समजताच कणकवलीवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. रेड्डी यांच्यासारखा कुशल व सेवाभावी डॉक्टर मिळणे म्हणजे रुग्णांसाठी मोठा आधार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन डॉ. विशाल रेड्डी यांची पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती करावी तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र फिजिशियनची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

