*कोंकण एक्सप्रेस*
*वैभवाडी हादरली! आचिर्णे गावात शिकारी दरम्यान गोळीबार; एका तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी*
*आचिर्णे-घाणेगडवाडी येथे पोलीस घटनास्थळी दाखल*
*वैभवाडी ः प्रतिनिधी*
वैभवाडी तालुका काल रात्री झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेने हादरून गेला आहे. तालुक्यातील आचिर्णे गावातील घाणेगडवाडी परिसरात झालेल्या या गोळीबारात एका २६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
*नेमकी घटना काय?*
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आचिर्णे गावातील कालव्याजवळ काही तरुण शिकारीसाठी गेले असताना हा गोळीबार झाल्याची प्राथमिक चर्चा परिसरात आहे.
*मयत व जखमींची नावे:*
मयत:सागर सुरेश पोटळे (वय २६, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे).जखमी: कृष्णा सुरेश कातकर (वय २५, रा. आचिर्णे, घाणेगडवाडी).
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनावळकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली. जखमी कृष्णा कातकर याला पुढील उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा गोळीबार नक्की कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

