*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामीण बालआरोग्यासाठी आशा सेविकांचे योगदान अनमोल – उपसभापती गणेशप्रसाद गवस*
*दोडामार्ग : शुभम गवस*
ग्रामीण भागातील बालकांच्या सुदृढ आरोग्यामागे आशा सेविकांचे सातत्यपूर्ण व समर्पित योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या जागरूकतेमुळेच बालके निरोगी राहतात, असे प्रतिपादन उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केले.
ते आशा सेविकांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. आरोग्यविषयक मार्गदर्शन, जनजागृती आणि समाजहिताच्या दृष्टीने आशा सेविका सातत्याने कार्यरत असून त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत असल्याचा गौरव त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामीण भागात कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही आशा सेविका मानधनाच्या पलीकडे जाऊन समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करतात. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या हक्काच्या न्यायासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा गवस यांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सौ. सायली निबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेघा अंधारी-कोकाटे, विस्तार अधिकारी (आरोग्य) विलास ठाकर, आरोग्य सहाय्यक मकरंद करमळकर, आरोग्य सेवक संतोष तुळसकर, कार्यक्रम सहाय्यक अजित सावंत, तालुका समूह संघटक स्वाती देसाई, नेहा गवस तसेच गटप्रवर्तक दीप्ती पवार व पूजा देसाई उपस्थित होत्या.
कार्यक्रमात आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

