अवकाळी पावसाची झलक; ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चव्हाट्यावर

अवकाळी पावसाची झलक; ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चव्हाट्यावर

*कोंकण एक्सप्रेस*

*अवकाळी पावसाची झलक; ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चव्हाट्यावर*

*पालकमंत्री नितेश राणेंनी गेल्यावर्षीच दिल्या होत्या रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना*

*अधिकाऱ्यांना कोणते रस्ते आपल्या अधिकारात येतात याचीच माहिती नसल्याचे झालेय उघड*

*कणकवली ः संजना हळदिवे*

अवकाळी पावसाची झलक सुरू होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अवकाळी पावसाचा पहिल्याच सुरुवातीला काही भागांतील खड्डेमय रस्ते पाण्याने भरलेले दिसून आले आहेत. यामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काही ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी पावसाळ्यापूर्वीच रस्ते खड्डेमुक्त व झाडीमुक्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झालेला दिसत नाही. आजही अनेक ग्रामीण रस्ते खड्डेमय असून, तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर दिला जात असल्याचे दिसून येते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शालेय बसच्या फेऱ्यांचे मार्गही अत्यंत खराब अवस्थेत असून, विद्यार्थ्यांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे. यामुळे पालकमांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये फक्त चिरे टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र, त्यानंतर आवश्यक असलेले डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी परिस्थिती आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे कोणता रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो, याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे कामांची जबाबदारी ढकलण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून दोन महिने बाकी असताना नियोजनबद्ध बैठक घेऊन ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!