*कोंकण एक्सप्रेस*
*पुढील पिढीला चिमणी केवळ चित्रातच दिसू नये; कणकवली विद्यामंदिर हायस्कूलमध्ये ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा*
*कणकवली ः संजना हळदिवे*
“चिऊताई चिऊताई दार उघड…” ही साद आणि आईच्या मायेने ऐकलेल्या चिमणीच्या गोष्टी आता केवळ स्मरणात उरतात की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सिमेंटच्या जंगलांमुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथील पर्यावरण सेवा योजना व हरितसेना विभागामार्फत चिमण्यांसाठी ‘कृत्रिम घरटे, खाऊ आणि पाणी’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
प्रशालेतील इको क्लबच्या २५ ते ३० विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. चिमण्यांना राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने सुंदर कृत्रिम घरटी तयार केली. केवळ घरटीच नव्हे, तर त्यामध्ये चिमण्यांसाठी दाणा-पाणी (खाऊ आणि पाणी) यांचीही चोख व्यवस्था करण्यात आली. यातील काही घरटी शाळेच्या निसर्गरम्य परिसरात लावण्यात आली, तर काही घरटी विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर आणि परिसरात लावून चिमण्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला.
यावेळी पर्यावरण सेवा योजना प्रमुख श्री. प्रसाद राणे आणि हरित सेना प्रमुख सौ. विद्या शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना चिमणी या पक्षाचे निसर्गचक्रातील महत्त्व पटवून दिले. चिमणी हा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी असून वातावरणातील हानिकारक कीटक खाऊन ती पर्यावरणाचे रक्षण करते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे त्यांचे प्रमाण कमी होत आहे, हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक वनीकरण विभाग कणकवलीचे वनक्षेत्रपाल श्री. अनिल पाटील व वनरक्षक श्री. तेजस चौगुले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे आणि सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. ए. व्हि. वणवे यांच्यासह इको क्लबचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यामंदिर हायस्कूलच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, चिमण्यांच्या चिवचिवाटाने परिसर पुन्हा गजबजण्यास मदत होणार आहे

