*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत पेट्रोल-डिझेल टंचाई; वाहनचालक हैराण*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शहरात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे बस स्थानक शेजारील तसेच पोलीस स्थानकाजवळील दोन पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक वाहनचालकांना इंधन न मिळाल्याने परत फिरावे लागत असून, काहींना पर्यायी पंपांचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान, या इंधन टंचाईमागे पुरवठा साखळीतील अडथळे कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

