*कोकण Express*
*कणकवली आगारातील एसटी चालकांना जिल्ह्याबाहेर ड्युटीसाठी पाठवू नका!*
*भाजप शिष्टमंडळाची राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यभरात कोरोनाच्या विषाणूचे थैमान सुरू असताना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विषाणू हातपाय पसरवत आहे. या सगळ्या परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः कणकवली तालुक्यातील एस. टी. चालकांना कोविड बाधित मोठ्या शहरांत ड्युटीवर पाठवल्यामुळे त्यातील काही चालक ‘पॉझिटिव्ह’ निघाले आहेत. त्यामुळे कणकवली तालुक्यात कोविडचे प्रमाण आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ड्युटीवर असणारे ड्रायव्हर जर पॉझिटिव्ह निघाल्यास त्यांचा खर्च कोण उचलणार व जीवीताची हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून आपण पालकत्वाच्या नात्याने त्यांच्यावर अन्याय होऊ न देता त्यांची योग्य काळजी घ्यावी व त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवू नये, अशी विनंती भाजपा कणकवली तालुका शहर मंडल अध्यक्ष तथा पं. स. कणकवलीचे सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदनव्दारे केली आहे.
यावेळी कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री, शक्ति केंद्र प्रमुख सदा चव्हाण, समीर प्रभूगावकर, प्रज्ञेश राणे आदी उपस्थित होते
निवेदनात म्हंटले की, कोरोनाच्या काळात रोजंदारीची समस्या निर्माण झाल्यामुळे हे कर्मचारी जीव मुठीत धरून नोकरी करत आहेत. गेल्या वर्षीचीच स्थिती पुन्हा यावेळीही निर्माण झाली असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यामुळे इतरांच्याही जीवीतास धोका आहे.