‘तिच्या कविता – तिचे गाणे’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

‘तिच्या कविता – तिचे गाणे’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*‘तिच्या कविता – तिचे गाणे’ कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी –  प्रथमेश गुरव*

महिला दिनाचे औचित्य साधून बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तिच्या कविता – तिचे गाणे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या संवेदनशील भावना, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि सकारात्मक विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चेंदवणकर यांनी केले. महिलांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे, तर आर्थिक स्वावलंबनासाठी करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली महिला कुटुंब व समाजात अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते आणि तिचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षमपणे विकसित होते, असे डॉ. धनश्री पाटील यांनी स्पष्ट केले. महिलांच्या कलागुणांना आणि विचारांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक जाण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे डॉ. मनीषा मुजुमदार यांनी सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या, तर काहींनी नामवंत कवींच्या कवितांचे वाचन केले. याशिवाय काही विद्यार्थिनींनी स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नाती आणि जीवनातील विविध भावनांवर आधारित गीते सादर करून कार्यक्रमात वेगळीच रंगत निर्माण केली. पाहुण्यांचा परिचय कु. श्रद्धा पालव यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. स्वरा गंगावणे हिने केले. तर कु. महिमा केळुसकर हिने आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या सुविद्य पत्नी, प्राध्यापिका यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!