*कोंकण एक्स्प्रेस*
*’क्वायर बोर्ड’च्या उद्यमिता विकास कार्यक्रमातून ग्रामीण विकासाला चालना – प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
‘क्वायर बोर्ड’च्या उद्यमिता विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी व्यक्त केले.
‘क्वायर बोर्ड’च्यावतीने अणसुरपाल ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उद्यमिता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ५० महिलांनी सहभाग घेत लाभ घेतला. उद्घाटनप्रसंगी क्वायर बोर्डचे रिजनल ऑफिसर श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच मालवणकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रज्ञाताई परब, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.एस. एच. माने, ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. विवेक चव्हाण, डॉ. सचिन परूळकर, डॉ. जी. पी. धुरी, प्रगती चव्हाण, साखरे, लेखापाल स्वामी आदी उपस्थित होते. एम.के.गावडे यांनी महिलांना काथ्या उद्योगाचे महत्त्व, त्यातील व्यवसायाच्या संधी आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये क्वायर बोर्डचे रिजनल ऑफिसर श्रीनिवासन यांनी काथ्यापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, तसेच ग्रामीण भागातील महिलांनी या उद्योगाचा लाभ घेत स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रोग्राम ऑफिसर साखरे मॅडम यांनी काथ्या उद्योगासंदर्भात शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि प्रशिक्षणाच्या संधींबाबत माहिती दिली. डॉ. विवेक चव्हाण यांनी ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देत महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्याचे आवाहन केले.
तिसऱ्या दिवशी क्षेत्रभेट घेण्यात आली.

