*कोंकण एक्सप्रेस*
*मोफत महाआरोग्य शिबिराचा 400 नागरिकांनी घेतला लाभ*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषद, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने कालेलकर सभागृहात आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा 400 नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला बालविकास सभापती तथा नगरसेवक गौरी मराठे, आकांक्षा परब, काजल कुबल, शितल आंगचेकर, सचिन शेटये, युवराज जाधव, सुमन निकम, गौरी माईणकर यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, रूग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर उपस्थित होते. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम, थायरॉईड, कॅन्सर, ईसीजी, मधुमेह, दंत व नेत्र तपासणी तसेच इतर सर्वसाधारण आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधेही विनामूल्य देण्यात आली. याशिवाय आयुष्यमान भारत व इतर आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांना कार्ड काढण्याची सविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिर यशस्वी होण्यासाठी होमिओपॅथीक विद्यार्थी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय पथक, ओरोस सिव्हिल हॉस्पिटल टीम यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

