*कोंकण एक्सप्रेस*
*जागतिक ग्राहक दिन साजरा ग्राहकांनी हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवावी-रवींद्र खेबुडकर*
*सिंधुदुर्गनगरी*
ग्राहकांनी केवळ आपल्या हक्कांची जाणीव न ठेवता ग्राहक म्हणून आपली कर्तव्येही जबाबदारीने पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. जागरूक, सजग आणि जबाबदार ग्राहक हा सशक्त व सुदृढ समाजाचा पाया असतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
ग्राहक संरक्षणाबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागच्यावतीने ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा ग्राहक समिती सदस्य ॲङ नकुल पार्सेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते. प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहक जागरूक असेल तरच बाजारपेठ पारदर्शक आणि प्रामाणिक राहू शकते. त्यांनी ग्राहकांना वस्तू खरेदी करताना बिल घेण्याची सवय लावावी, ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता बाळगावी, ग्राहकांनी आपले हक्क ओळखून फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे म्हणाल्या की, ग्राहकांनी नेहमी जागरूक राहावे. विशेषत: आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी. नियमित बँक स्टेटमेंट तपासावे. काही शंकास्पद आढळल्यास बँकेशी संपर्क साधावा. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना बिल घेणे, उत्पादनावरील माहिती तपासणे, कालबाह्यता तारीख पाहणे, तसेच शंका असल्यास संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे, फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहणे आणि इतरांनाही जागरूक करणे हेही प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे असेही त्या म्हणाल्या.

